नागपूरात १०६ महिलांमध्ये आढळला स्तनाचा कर्करोग

0
15

नागपूर,. दि 10 – जागतिक स्तन कर्करोग जागृती अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘आयब्रेस्ट एक्झाम’ हे अत्याधुनिक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले. गेल्या पाच महिन्यात या दोन्ही रुग्णालयात ३,७०० महिलांची तपासणी करण्यात आली. यात मेडिकलमध्ये स्तन कर्करोगाचे ५० तर मेयोमध्ये ५६ असे एकूण १०६ रुग्ण आढळून आले. ही आकडेवारी धक्कादायक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर तर दुस-या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता, मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. यामुळे याचे वेळीच निदान होऊन उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी ‘आयब्रेस्ट एक्झाम’ हे अत्याधुनिक उपकरण वरदान ठरले आहे. मेडिकल व मेयोच्या क्ष-किरण विभागातर्फे बाह्यरुग्ण विभागात हे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या यंत्रावर रोज २० वर रुग्णांची तपासणी केली जात आहे. हे यंत्र स्कॅनरच्या स्पर्शाने महिलांमध्ये कॅन्सर पेशीचे निदान करते. विशेष म्हणजे, हे यंत्र रेडिएशन किंवा वेदनामुक्त आहे. या शिवाय कुठेही हलविता येते. मेयोमध्ये आतापर्यंत १२१३ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५६ महिलांना स्तन कॅन्सर असल्याचे निदान झाले. प्रादेशिक मनोरुग्णालयात केलेल्या १०३ मनोरुग्ण महिलांच्या चाचणीपैकी चार महिलांना स्तनाचा कॅन्सर असल्याचे आढळले. मेडिकलमध्ये गेल्या पाच महिन्यांमध्ये २५०० महिलांची तपासणी करण्यात आली. यात ५० महिलांमध्ये कॅन्सर आढळून आला. यातील काही महिलांमध्ये पहिल्या स्टेजमध्येच कॅन्सरचे निदान झाल्याने पुढील धोके टाळणे शक्य झाले आहे.