भारतात आता सोन्याऐवजी विड्यांचा धूर निघतो – मकरंद अनासपूरे

0
17

गडचिरोली-दि. 17 -ज्या भारतात कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता, त्याच भारतात आता विड्या, सिगारेटचा धूर निघतो आहे. देशात सध्या व्यसनाधीनतेची आग धगधगत आहे. हा आपला वर्तमान गलितगात्र आहे. त्यामुळे भविष्य सुधारण्यासाठी आता आपल्याला आग लावणाºयांच्या यादीत नव्हे तर, आग विझविणाºयांच्या यादीत सहभागी व्हावे लागेल, त्यासाठी सर्र्वांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करून त्याची परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेता मकरंद अनासपूरे यांनी आज येथे केले.

‘मुक्तीपथ’अभियानाअंतर्गत धानोरा मार्गावरील स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर आज बुधवारी दुपारी चार वाजता आयोजित व्यसनमुक्तीदिन, दारू-तंबाखूमुक्तीसाठी होळी व संकल्प कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी सुप्र्रसिध्द समाजसेवक डॉ. अभय बंग, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
मकरंद अनासपूरे पुढे म्हणाले, व्यसनाधीन लोक जगात अकारण हेलपाट्या मारायला आल्यागत वागतात. त्यांच्यामुळे कुटंूब, समाज वातावरण दूषित होते. पर्यायाने आपला देश बदनाम होतो. भारतीयांना भारतीयांवर थुंकायची सवय नाही, हे जाणून असताना देखील आपण व्यसनाधीनतेपुढे नतमस्तक होत आपल्या भूमातेवर थुंकतो. यातून आपण काय सिध्द करत आहोत, याची सर्वांनी एकदा चिंता करावी, असे ते म्हणाले.
नकारात्मक व्यसनांमुळे नुकसानीशिवाय काहीच मिळत नाही. मात्र सकारात्मक व्यसनांमुळे बरेच काही साध्य करता येऊ शकते, असे सोदाहरणासहित स्पष्टीकरण मकरंद अनासपूरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. माणसाने काही ध्येय मनात ठामपणे ठरविले, तर सर्वच बाबी साध्य करता येऊ शकतात. त्यामुळे व्यसनाधीनतेला दूर सारण्याचा संकल्प करा व निर्धारपूर्वक यशस्वी करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. तत्पूर्वी डॉ. अभय बंग यांनी मुक्तीपथ अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. अमृत बंग यांनी मकरंद अनासपूरे यांचा परिचय करून दिला. संचालन तुषार खोरगडे यांनी केले. यावेळी श्री. गुप्ता, संतोष सावळकर, डॉ. कमलेश भंडारी, मडावी उपस्थित होते. निर्माण व नवचैतन्य मंडळाने व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्र्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.