गरोदर महिलांची काळजी घेणे कुटुंबातील पुरुषांचे कर्तव्य – उषा मेंढे

0
17

चिचगाव येथे शुन्य माता व बालमृत्यू अभियानाचा शुभारंभ
गोरेगाव,दि.२७ : घरी सर्वात जास्त काम करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. जिल्ह्यात गरोदर महिला व बालकांचा मृत्यू होवूच नये यासाठी अभियान राबविण्यात येत असून हे अभियान पुरुष मंडळीसाठी आहे. गरोदर महिलांच्या आरोग्याची व आहाराची काळजी घेणे प्रत्येक कुटुंबातील पुरुष मंडळींची जबाबदारी नव्हे तर कर्तव्यच आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
२६ जानेवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील आरोग्य उपकेंद्रात शुन्य माता व बालमृत्यू अभियानाच्या उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, श्रीमती सई काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, चिचगावच्या सरपंच वैशाली तुरकर, तालुका आरोग्य अधिकारी व्ही.एस.नाकाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.श्रीमती मेंढे म्हणाल्या, एका वर्षात या अभियानाची अत्यंत चांगली फलनिष्पत्ती राहणार आहे. जिल्ह्यातील कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींना सहकार्य करुन घर व पाणी पट्टी कर वेळीच भरुन गाव विकासाला हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यातील गरोदर स्त्रियांच्या आरोग्य व आहाराची काळजी नियमीत घेतली जावी यासाठी पुरुष मंडळीची ही सभा आहे. जन्माला येणारे बाळ हे सुदृढ जन्माला यावे यासाठी महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दयावे. गरोदरपणात महिलेच्या रक्तात लोहाचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य भरपूर प्रमाणात महिलांना खावू घालावीत. त्यामुळे हिमोग्लोबीन प्रमाण वाढण्यास मदत होईल. नियमीत हिमोग्लोबीन व रक्तदाब तपासणी करावी.बाल किंवा माता मृत्यू झाल्यास आपण डॉक्टरांना दोष देतो असे सांगून श्री.काळे म्हणाले, अशाप्रकारचे मृत्यू होवूच नये ही सर्वस्वी जबाबदारी घरच्या पुरुष मंडळीची आहे. या अभियानातून पुरुष मंडळीने जबाबदारीने गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली तर जिल्ह्यात गरोदर माता व बालमृत्यू होणारच नाही. एका वर्षाच्या आत माता व बालमृत्यू शून्यावर आणून युरोपच्या पुढे भारतात गोंदियात काम झालेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मुल आणि महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली तर सुदृढ समाज जन्माला येईल. कोणत्याही क्षेत्रात काम प्रभावीपणे करण्यासाठी यंत्रणा ही लाभाथ्र्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण ९ एचबी पर्यंत आहे असे सांगून ते म्हणाले, हे प्रमाण ११ ते १३ एचबी पर्यंत असावे. महिलांना आहार वेळेवर मिळाला पाहिजे. आई ही स्वत:च्या मुलीची काळजी घेते पण ती सूनेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. घरात नवीन जीव जन्माला येणार ही आनंदाची बाब असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे घरच्या पुरुष मंडळींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून बोलतांना डॉ.निमगडे म्हणाले, जिल्ह्यात एकही माता व बाल मृत्यू होणार नाही याची काळजी या अभियानातून घेण्यात येईल. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करुन गोंदिया जिल्ह्याचे नाव देशभर होईल. जिल्ह्यात यापुढे बालमृत्यू झाला तर त्याची तहसिलदारामार्फत चौकशी होईल. जेथे माता मृत्यू होईल त्या घरी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वत: भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित गरोदर महिलेच्या पती व सासरे तसेच गरोदर महिलांना देखील हिमोग्लोबीनची माहिती, हिमोग्लोबीन वाढीसाठी गरोदर महिलेच्या आहारात आवश्यक घटक याची माहिती आरोग्य सेविका कल्पना साखरे यांनी दिली. या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी अनेक गरोदर महिला, पती, सासरे, ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी व्ही.एस.नाकाडे, वैद्यकीय अधिकारी एल.एस.पाटील, कल्पना साखरे, वनिता वाटकर, पर्यवेक्षिका श्रीमती परांजपे, विद्या रहांगडाले, प्रशांत बन्सोड, श्री.रंगारी, श्री.राऊत, श्री.राठोड, कल्याणी चौधरी, ज्योती मेश्राम, मुक्ता पारधी, प्रमिला कुंभरे, अप्सरा बन्सोड, श्रीमती सिरसाठे यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांच्या हस्ते रामचंद्र रहांगडाले, महेंद्र ठाकरे, दिलीप राऊत, सोमेश्वर तुरकर, ताराचंद पटले, मनोज चौधरी, विनोद चौधरी, सुरेंद्र मेश्राम यांना गरोदर स्त्रीचे सूचना पत्रक वाटप करण्यात आले. संचालन व उपस्थितांचे आभार तालुका वैद्यकीय अधिकारी व्ही.एस.नाकाडे यांनी मानले.