सामान्य माणसात विश्वास निर्माण करा- राजकुमार बडोले

0
12

गोंदिया,दि.२७ : जिल्ह्यातील अवैध धंदयाला आळा बसवून जातीय अत्याचाराचे गुन्हे घडणार नाही तसेच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याकडे पोलीस विभागाने लक्ष दयावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र पोलीसांनी सामान्य माणसात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.2५ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.ना.बडोले पुढे म्हणाले, मागच्या काही वर्षापूर्वी जिल्हयातील लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यात पोलीस विभागाला काही प्रमाणात यश आले आहे. नगर परिषदेच्या निवडणूकीच्या काळात पोलीसांनी चांगले काम केले आहे. गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक कायम असला पाहिजे. पोलीसांनी गुन्हेगारांचा छळा लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले तर त्यांचा सत्कार करण्यात यावा असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळण्यास मदत होईल. अवैध दारुची वाहतूक जिल्ह्यातून होणार नाही यासाठी पोलीस विभागाने दक्ष राहून काम करावे. भविष्यातही पोलीस विभागाने चांगलीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरात ज्या भागात गुन्हे जास्त घडतात तेथे सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत.प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला गुन्हयाशी संबंधित विशेष कक्ष स्थापन करुन ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या गुन्हयाची तसेच त्यांच्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाची सुध्दा पोलीसांनी तातडीने दखल घ्यावी असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्ह्यात ६ तपासणी नाके तयार करुन जिल्ह्यात होणाऱ्या आवागमनाची तपासणी करण्यात येईल. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व उर्वरित भागातील नागरिकांना सुरक्षेची हमी देवून प्रत्येक नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नगर परिषद निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात चोख बंदोबस्त होता. या दरम्यान आलेल्या तक्रारीचे निराकरण तातडीने करण्यात आले. बीट पोलीसींग पध्दतीचा वापर करुन १० बीट तयार करुन याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.नागरिकांचे समाधान यावर पोलीसांचा भर असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, पोलीस व जनतेचे नाते भक्कम करण्यात येईल. आदरयुक्त दरारा पोलीसांचा असावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्वच प्रकारच्या गुन्हयांवर आळा घालण्यात येईल. पोलीस विभागाची जवळपास १५० कोटीची कामे पोलीस महासंचालकांनी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जयराज रणवरे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, नक्षल सेलचे पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे आणि जिल्ह्यातील सर्व १६ पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते. यावेळी सादरीकरणातून जिल्ह्यातील घटनांची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली.