भटक्यांची मुले शिकली पाहिजे!

0
15

भंडारा दि. 30 –: भटक्या समाजात अज्ञान आणि अज्ञानामुळे अंधश्रध्दा सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी भटक्यांची मुले शिकली पाहिजेत जगाचे ज्ञान शिक्षणाशिवाय कळणार नाही, असे मत भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय भटके-विमुक्त विकास परिषदेचे भिलेवाडा येथे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.बिऱ्हाड परिषदेचे अध्यक्ष उकांडा वडस्कर, उपाध्यक्ष शिवा कांबळी, संयोजक दिलीप चित्रीवेकर, प्रवीण जगताप, प्रकाश शेंडे, नत्थुजी बिसने, अंकोश तांदुळकर, वासुदेव सुतार बहुरुपी, व्यंकट ठाकरे वडार, शिवाजी गायकवाड कैकाळी, शामराव शिवणकर गोपाळ, राजू शेंडे होली, चैनसिंग कतारी, दीपक अंकुशे ओतारी, गोपीचंद शिवणकर पांगूळ, इंदल नारनवरे पारधी राजकुमार दोनोडे आदी उपस्थित होते.
भिकु इदाते म्हणाले, भटक्या समाजासमोर शिक्षणाचा, आरोग्याचा, घरादाराचा, रोजगाराचा असे अनेक प्रश्न आहेत. भटके-विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते अनेक मोर्चे, आंदोलन करुन हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात, आता मात्र हे प्रश्न मोर्चे, आंदोलनाने सोडविण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर भर देवून सोडविण्यासाठी पालकांनी व कार्यकर्त्यांनीही पुढाकार घ्यावा. भटक्यांची मुले जोपर्यंत शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना सरकारच्या योजना करळणार नाही. भटक्यांच्या संघर्षाचा लढा कायम सुरु राहिल. भटक्यांची सव्वाकोटी लोकसंख्या असूनही त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही. बार्टीच्या धरतीवर भटक्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी इदाते यांनी सांगितले. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बिऱ्हाडासह महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम, मेहकर, वर्धा या जिल्ह्यातील भटक्या समाजांची १४०० बिऱ्हाड भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावात मिळेल त्या साधनाने पोहचले होते. नागजोथी, बहुरुपी, ओतारी, कतारी, बेलदार, पांगूळ, वडाळ, गिरी, पारधी, गोपाळ, सोंजारी, मांगगारुडी, गोंधळी, मसनजोगी, कैकाळी, जोशी, होली, बैगागोंड आदी भटक्या समुदायातील लोक या परिषदेत सहभागी झाले होते.