गांधीटोला ठरले ‘स्मार्ट ग्राम’

0
13

साखरीटोला ,berartimes.com दि.०६: शासनाच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत म्हणून गांधीटोला ग्रामपंचायतला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ग्रामपंचायतला पुरस्कृत करण्यात आले असून १० लाख रूपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे सालेकसा तालुक्यातून एकमात्र गांधीटोला ग्रामपंचायतने हा पुरस्कार पटकाविला आहे.
गाव विकासाकरिता असलेल्या शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत. या योजनांची नियमीत अंमलबजावणी होत असल्याने गांधीटोला ग्रामपंचायत आघाडीवर आहे. यामुळेच ग्रामपंचायतने यापूर्वी निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, पर्यावरण विकासरत्न, दलीतवस्ती सुधार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार, साने गुरूजी स्वच्छ शाळा विभागीयस्तर पुरस्कार पकटाविला आहे.
याचीच दखल घेत गांधीटोला ग्रामपंचायतला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार बहाल करण्यात आला असून सरपंच रेखा फुंडे, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, ग्रामपंचायत सदस्य किशोर भांडारकर, मधू चर्जे, शालू कोरे, आशा मुनेश्वर, वंदना बोहरे, ग्रामसेवक एस.एच.रहांगडाले यांनी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी पंचायत समिती सभापती तुकाराम बोहरे, टी.जी.फुंडे, पोलीस पाटील व आंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले.