काँग्रेसचे शेतकरी नेते म्हणजे पुतण्या-मावशीचे प्रेम-खा.रावसाहेब दानवे

0
32

कुरखेडा, दि.9: सोन्याच्या ताटात जेवणारे काँग्रेसचे शेतकरी नेते म्हणजे पुतण्या-मावशीचे प्रेम असल्याची खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज येथे केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
खा.दानवे पुढे म्हणाले, जगात सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपच्या सरकारने अडीच वर्षाच्या कार्यकाळात गोरगरीब शेतकरी व शेतमजुरांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. त्याचाच परिणाम म्हणून नगर परिषद निवडणुकीत जनतेने भाजपला विजयी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करुन खा.दानवे यांनी काँग्रेसच्या राजवटीचा खरपूस समाचार घेतला.
प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, देसाईगंज नगर परिषदेचे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष राम लांजेवार उपस्थित होते.
याप्रसंगी खा.अशोक नेते म्हणाले, जिल्ह्यातील सात राज्य मार्गांचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गांमध्ये करण्यात आले असून, त्यासाठी २ हजार ९४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार असून, हा लोहमार्ग तेलंगणातील मंचेरियलपर्यंत नेण्यात येणार आहे. सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनतेने भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही खा.नेते यांनी यावेळी केले.