प्रत्येक गरीबाला 2019 पर्यंत घरकुल मिळणार – खासदार पटोले

0
9

गोसीखुर्द पुनर्वसन जनसुविधेसाठी 260 कोटीचा निधी
वाढीव कुटूंबाचा सर्वांना मोबदला मिळणार
भंडारा,दि. 20 :- प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील प्रत्येक गरजू व गरीब व्यक्तीला 2019 पर्यंत घरकुल देण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी बीपीएल किंवा कुठलीही आर्थिक अट नसून प्रत्येक गरजू व गरीबाला घरकुल मिळेलच अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी दिली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय जनता दरबारात ते बोलत होते. आमदार ॲड. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, तहसिलदार संजय पवार व विविध विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गोसीखुर्द धरणात जी गावे गेली त्या गावांचे पुनर्वसन करतांना जनसुविधायुक्त पुनर्वसनासाठी केंद्र सरकारनी 260 रुपयांचा निधी दिलेला असून येत्या दोन वर्षात पुनर्वसन गावात जनसुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या असून योग्य जनसुविधा निर्माण होतील, असे खासदारांनी सांगितले. प्रकल्पग्रस्त सर्व कूटुंबाला वाढीव कुटूंबाचे पैसे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. गोसीखुर्दही पूर्ण करण्यात येईल व पुनर्वसित तसेच प्रकल्पग्रस्तांची मागणीही पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
महसूल अभिलेख तसेच सातबारा अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून वर्ग-2 च्या जमीन वर्ग-1 करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व वर्ग-2 च्या जमीनी एका महिन्यात वर्ग-1 करण्यासाठी तहसिलदार यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. विकासाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत मानून शासनाने ग्रामपंचायतीला मोठया प्रमाणात अधिकार प्रदान केले आहेत. विकास निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीनी आपल्या गावाच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करावा व विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
झुडपी जंगल व सामुहिक वन हक्क दाव्यांचे सर्व प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. प्रलंबित विज जोडण्या 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पुनर्वसन करतांना स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी ठेवण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी या जनता दरबारात केल्या. त्यावर बोलतांना खासदार म्हणाले की, स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी असलेल्या सर्व गावांचा सर्वे करुन पर्यायी जागा उपलब्ध करुन दयावी तसेच अभिलेख दुरुस्ती करावी.
मुख्यमंत्री पांदण रस्ते योजनेत रस्त्यांची कामे करुन घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. भंडारा शहरातील अतिक्रमणधारक व छोटे व्यवसायी यांच्यासाठी शहर विकास निधी योजनेंतर्गत कायमस्वरुपी गाळे तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी अवैद्य दारुविक्री संबंधी तक्रार मांडल्या असता अवैद्य दारु विक्री तात्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या जनता दरबारात घरकुल, पट्टेवाटप झुडपी जंगल, स्मशानभूमी, पुनर्वसन, निराधार योजनेचा लाभ, पिण्याचे पाणी, रस्ते, शौचालय, राष्ट्रीय कुटूंब योजना, वीज, बसस्टॉप, शाळा, वनहक्क दावे यासह विविध प्रश्न व समस्या नागरिकांनी मांडल्या. सर्व प्रश्नांची दखल घेवून प्रशासनाने त्या विहित मुदतीत सोडवाव्या, अशा सूचना खासदारांनी केल्या. या जनता दरबारात नागरिकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.