वन व कृषी संस्कृतीचा विकास व्हावा-अभय बंग

0
13

गडचिरोली दि.२६-: ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत. त्या तुलनेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी आहेत. कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या एकरूप व्हाव्या यासाठी शेतकरी नेते शरद जोशींनी प्रयत्न केले. औद्योगिक संस्कृती व तंत्रज्ञान संस्कृतीचा विकास झाला. मात्र वनसंस्कृती व कृषी संस्कृतीचा फारसा विकास झाला नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी वन व कृषी संस्कृतीचा व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
अखिल भारतीय तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा येथील संस्कृती सभागृहातील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरीत शनिवारी थाटात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप, शेतकरी नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, काकासाहेब गडकरी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, देवराव पाटील म्हशाखेत्री, शालिक पाटील नाकाडे, ईश्वर मत्ते, अरविंद बोरकर, अशोक गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शेषराव मोहिते म्हणाले, १९९० सालानंतर आपण आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासून सभोवतालच्या बदलाचा वेगही वाढला. मात्र या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणार नाही, अशीच आर्थिक धोरण राहिली. खुलीकरण आले ते उद्योगधंद्याच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. शेती क्षेत्रात खुलीकरण आलेच नाही. विकासाच्या प्रक्रियेतील अपरिहार्य ेटप्पा म्हणून खुलीकरण स्वीकारण्यात आले. मात्र राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे अन् विचारसरणीचे असोत त्यांनी या खुल्या अर्थव्यवस्थेचा शिरकाव शेती व्यवसायात होऊच दिला नाही. यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे, असे डॉ. मोहिते म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संचालन प्रा. मनिषा रिठे यांनी केले. सदर कार्यक्रमात आम्ही लटिके ना बोलू, कंसातील माणसं, माझी गझल निराळी या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.