१३५ शाळांत ११00 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

0
18

गोंदिया,दि.०5मार्च- शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून यांतर्गत यंदा जिल्ह्यातील १३५ शाळांत ११00 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.
शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचे बोलले जात असून शिक्षणावरील आजचा खर्च बघितल्यास ही बाब खरोखरच वाटते. या महागड्या शिक्षणामुळे अंगी गुण असलेले विद्यार्थी वंचित राहू नये , यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. यांतर्गत गरजू व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांत २५ टक्के प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी गरजू घटकाला याचा चांगलाच फायदा मिळत असून अशांची मुले शिक्षण घेत आहेत.
पुढील शिक्षण सत्रासाठी शाळा नोंदणी १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज ५ ते २१ तारखेपर्यंत भरले आहेत. या योजने अंतर्गत १ ते ९ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यावयाचे आहेत.
प्रवेश घेण्याच्या विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १0 ते ११ मार्चपर्यंत दर्शवावयाच्या आहेत. दुसरी लॉटरी १४ व १५ मार्च रोजी असून १६ ते २१ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे.
२२ व २३ मार्चपर्यंत विहीत मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या असून तिसरी लॉटरी २४ व २५ मार्च रोजी राहील. विहीत मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे २७ मार्च ते १ एप्रिल व विहीत मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा ३ ते ६ एप्रिल पर्यंत दर्शवायच्या आहेत.
चवथी लॉटरी ७ व ८ एप्रिल रोजी असून १0 ते १५ एप्रिल दरम्यान विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १७ व १८ एप्रिल रोजी दर्शवायच्या असून पाचवी लॉटरी १८ एप्रिल आणि २0 एप्रिल रोजी राहील. २१ ते २७ एप्रिल दरम्यान पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. तर २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या आहेत.
या प्रवेश प्रकियेदरम्यान संबधित तालुक्याचे गटसाधन केंद्रस्थळी मदत केंद्र निर्माण केले आहे. या काळात सर्व शाळांनी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांंची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत एल. पुलकुंडवार व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे.