डीसीपी बावचे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

0
16

नागपूर दि.११: नक्षल्यांचा थिंकटँक समजल्या जाणार्‍या प्रा. जी. एन.साईबाबाला दिल्ली येथून अटक करून आणणारे नागपूर येथील पोलीस उपायुक्त तथा तत्कालीन अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुहास बावचे यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.नक्षल्यांची संबंध असल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन. साईबाबासह ५ आरोपींना गडचिरोली न्यायालयाने ७ मार्च रोजी जन्मठेपेची शिक्षा व एका आरोपीला १0 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अहेरीचे तत्कालीन डीवायएसपी सुहास बावचे व त्यांच्या पथकाने २0१४ मध्ये दिल्ली येथून प्रा. साईबाबाला मोठय़ा शिताफीने अटक करून अहेरीला नेले. त्यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून पुरावे गोळा केले. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक साहित्यांना पुरावे मानून न्यायालयाने या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गडचिरोली न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक मानल्या जातो. सुहास बावचे सध्या नागपूर शहर पोलीस दलात डीसीपी (मुख्यालय) म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विमानतळ येथे पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.