लाखनी येथे सामूहिक विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी

0
11

लाखनी,दि.12: श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कुणबी सेवा मंडळ, लाखनी आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्याने लाखनी येथे २८ एप्रिल रोजी सकाळी १0.४५ वाजता सर्मथ विद्यालयाच्या पटांगणावर भव्य सर्वजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या कठीण परिस्थितीत लग्न समारंभावर होणारा अमाप खर्च टाळून वधू-वर मातापित्यांची जुळवाजुळव करताना होणारी दमछाक व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच समाजातील श्रीमंत गरीब यांच्यामध्ये निर्माण झालेली आर्थिक दरी कमी करून अनेक वर-वधू एकाच मांडवाखाली लाखोंच्या आशीर्वादाने व साक्षीने विवाह बंधनात बांधले जावेत, या उद्देशाने दरवर्षी श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कुणबी सेवा मंडळ लाखनी आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सर्वजातीय विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. या सोहळ्याचे हे २४ वे वर्ष आहे. शुभमंगल कन्यादान सामूहिक विवाह योजनेंतर्गत प्रत्येक जोडप्याला २0 हजार रुपये मिळणार असून त्यासाठी वर-वधू यांचा जन्म दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवासी प्रमाणपत्र, वर-वधू पालक शेतकरी/शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधूच्या आईच्या नावे असलेले पासबुक सत्यप्रत ई. कागदपत्रे आवश्यक आहेत. तत्पूर्वी विवाह सोहळ्याच्या नोंदणीसाठी वर पक्षाकडून ३ हजार रुपये तर वधू पक्षाकडून ४ हजार रुपये आकारण्यात येतील, नोंदणीसाठी वैभव ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मुरमाडी, नेहा फोटो स्टुडिओ लाखनी व संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे संपर्क साधावा. विवाह नोंदणीची अंतिम तारीख २४ मार्च असून जास्तीत जास्त सर्वजातीय समाजबांधवांनी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष जयकृष्ण फेंडर, उपाध्यक्ष उमराव आठोडे, सचिव रामदास सार्वे व युवा कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी केले आहे.