पत्रकारांनी सकारात्मक लिखाण करुन पुरस्कार योजनेत सामिल व्हावे – मनिषा सावळे

0
13

वर्धा,दि.१६(berartimes.com)-:राज्य शासनाच्या वतीने शासकिय योजनांची उत्कृष्ट मांडणी स्वरुपात लिखाण करणाऱ्या पत्रकार, संपादक, वार्ताहर, ई-माध्यम प्रतिनिधी तसेच छायाचित्रकार यांना विविध पुरस्कार देण्याची योजना आहे.यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम, जलयुक्त शिवार, स्वच्छता अभियान यासारख्या योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रातून सकारात्मक लिखाण करावे व शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेत सामिल व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी पत्रकार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
जिल्हा माहिती कार्यालय व वर्धा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे वतीने नुकतीच सामाजिक न्याय भवन सभागृह येथे पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन शेतीतज्ज्ञ जयंतराव साळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया, वंदनाताई जावंधिया, वर्धा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, डॉ. राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ पत्रकार आनंद शुक्ला, प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.पाचवेळा महात्मा गांधी तंटा मुक्त गाव मोहिम पुरस्कार प्राप्त प्रवीण होणाडे यांनी पुरस्काराबाबत आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रवीण वानखेडे व आभार प्रफुल व्यांस यांनी केले.