विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू, एका पोलिसाचाही समावेश

0
12

गडचिरोली दि.१९:विषारी दारु प्यायल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना काल(दि.१८)रात्री ८ वाजताच्या सुमारास मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत सायगाव येथे घडली. उमेश बुधू मडकाम(३५) रा.सायगाव व जितेंद्र ऋषी दुगा(२०) रा.चिचेवाडा व तुळशीराम करंगामी अशी मृतांची नावे आहेत. तुळशीराम करंगामी हा गडचिरोली पोलिस मुख्यालयातील श्वान पथकात कार्यरत होता.
धानोरा तालुक्यातील सायगाव या गावचा समावेश कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत होतो. काल सायगाव येथे प्रभाकर सुंदरशहा मडकाम यांच्या मुलाच्या नामकरणविधीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर काही जण गावात एके ठिकाणी दारु पीत बसले होते. काही क्षणातच तिघांची प्रकृती बिघडली. त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उमेश बुधू मडकाम व जितेंद्र ऋषी दुगा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यातील तिसरा व्यक्ती तुळशीराम करंगामी याची प्रकृती गंभीर असून त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र आज सकाळी तुळशीराम करंगामी याचाही मृत्यू झाला. तुळशीराम करंगामी हा धानोरा तालुक्यातील चुडियाल येथील मूळ रहिवासी असून, प्रभाकर मडकाम यांचा तो बहीणजावई होता. सध्या तो गडचिरोली पोलिस मुख्यालयातील श्वान पथकात कार्यरत होता. जितेंद्र दुगा हा घरबांधकाम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सायगावला आला होता. काल नामकरणविधीचा कार्यक्रम असल्याने तो सायगाव येथेच थांबला. आज त्याच्या घरी पूजेचा(देवकाम)कार्यक्रम होता. त्यासाठी तो चिचेवाडा येथे येणार होता. परंतु तत्पूर्वीच दारुने त्याचा बळी घेतला. दारु विषारी होती की कसे, याविषयीची शहानिशा तपासाअंतीच होणार आहे. मात्र, औषधाची बाटली अर्धवट स्वच्छ करुन त्यात दारु आणण्यात आली होती, अशी गावात चर्चा आहे.