लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही- जिल्हाधिकारी काळे

0
10

२ एप्रिलला पोलिओ लसीकरण मोहीम
ङ्घ १ लाख बालकांना मिळणार पोलिओ डोज
गोंदिया,दि.२२ : जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिक व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजन करुन करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष अभिमन्यू काळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात २० मार्च रोजी पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, नागपूर येथील सहसंचालक आरोग्य विभाग कार्यालयाचे डॉ.साजिद खान, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.राज पऱ्हाडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश जायसवाल, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सी.आर.टेंभूर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी ५ वर्षाखालील सर्व मुलांचे एकाच दिवशी पोलिओचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याकरीता दरवर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येते. जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २९ जानेवारी २०१७ ला पहिली मोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात येत्या २ एप्रिल २०१७ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे १,०४,९४५ उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८६२०३ तर शहरी भागातील १८७४२ बालके आहेत. एकूण बुथची संख्या १३८५ राहणार असून यामध्ये ग्रामीण भागात १२५१ तर शहरी भागात १३४ बुथ राहणार आहेत. मनुष्यबळ ३१५२ लागणार असून ग्रामीण भागात २८४२ तर शहरी भागात ३१० काम करणार आहेत.
बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घरभेटीद्वारे सुटलेल्या लाभार्थ्यांना डोज पाजण्यात येणार आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशा दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रात पाडे/वस्तया/विटभट्टया/शेतात राहणारे मजूर, मेंढपाळ, परप्रांतातून आलेली कुटुंबे, धाबे, शेतावरील घरे, बांधकामाची ठिकाणे, झोपडपट्टया, ज्या भागात नकारार्थी लाभार्थीचे कार्यक्षेत्र आहे, प्राथमिक लसीकरण कमी आहे अशा सर्व क्षेत्रात घरोघर लसीकरण राबविण्यात येणार आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक, टोलनाके, विमानतळ येथे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते अशा सर्व ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रांझिट टिमचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी तुरळक लाभार्थी असण्याची शक्यता असते अशा ठिकाणी मोबाईल टिमचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण व शहरी भागात आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, समाजसेवी संघटना, स्वयंसेवी संस्था, रेल्वे स्टेशन प्रबंधक, बस आगार प्रमुख व सर्व विभागातील खाते प्रमुखांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.