डोंगरगडमध्ये आजपासून चार एक्स्प्रेसचा थांबा

0
10

गोंदिया दि.२८-: दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माता बम्बलेश्वरी मंदिर डोंगरगढ येथे चैत्र वनरात्री पर्वानिमित्त २८ मार्च ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत डोंगरगढ येथे लाखो श्रद्धाळूंची ये-जा राहणार आहे. त्या दृष्टीने डोंगरगढ स्थानकावर चैत्र उत्सवादरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे अतिरिक्त गाड्यांची सोयी करण्यात आली आहे. तसेच उत्सवादरम्यान काही रेल्वेगाड्यांचा डोंगरगढ स्थानकात थांबा व काही गाड्यांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.
डोंगरगड स्थानकावर गाडी क्रमांक (२१३०/२१२९) हावडा-पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, गाडी (१२८१२/१२८११) हटिया-लोकमान्य तिळक-हटिया, गाडी (१८४७३/१८४७४) पुरी-जोधपूर-पुरी, गाडी (१२९०६/१२९०५) हावडा-पोरबंदर-हावडा या गाडांच्या थांबा अस्थायी स्वरूपात २८ मार्च ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत दोन मिनिटांसाठी देण्यात आला आहे.
याशिवाय गाडी क्रमांक (५८२०८) जुनागड रोड-रायपूर, गाडी (५८२०४) रायपूर-गेवरा रोड, गाडी (५८८१८) तिरोडी-तुमसर तसेच गाडी (५८८१७) तुमसर-तिरोडी या गाड्यांचे सदर कालावधीसाठी डोंगरगढपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. तसेच सदर कालावधीसाठी गाडी (६८७४१/६८७४२) दुर्ग-गोंदिया-दुर्ग या गाडीला रायपूरपर्यंत वाढविण्यात आले आहे. चैत्र उत्सवादरम्यान डोंगरगड येथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू येतात. रेल्वेगाड्यांच्या सर्वच बोग्या ‘हाऊसफुल्ल’ असतात. शिवाय गर्मीमुळे प्रवाशांना मोठीच गैरसोय होते. रेल्वे प्रशासनाने सदर कालावधीसाठी काही गाड्यांचा अस्थायी थांबा व काही गाड्यांचे विस्तारीकरण डोंगरगडपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. सदर उत्सवात गर्दीमुळे प्रवाशांना कसल्याही प्रकारची असुविधा होवू नये, यासाठी मंडळद्वारे पाच अतिरिक्त तिकीट काऊंटर, १८ अतिरिक्त बुकिंग कर्मचारी, ३९ तपासणी कर्मचारी, २० रेल्वे सुरक्षा दलाचे जवानांसह स्काऊट-गाईडचे सदस्य तैनात राहणार आहेत. त्यासोबतच स्थानकात अतिरिक्त प्रसाधन, वॉटर बुथ व सहायता केंद्राची सुविधा राहील.