चिचपल्लीचे बांबू प्रशिक्षण केंद्र रोजगार देणारे केंद्र बनावे – ना. सुधीर मुनगंटीवार

0
8

चंद्रपूर,दि.२८-चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही चंद्रपूर जिल्ह्याची ओळख म्हणून संपूर्ण देशात ओळखले गेले पाहिजे. या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले स्वतंत्र व्यवसाय उभारावे . व्यवसायाभिमूख नव्हे तर हाताला काम देणारा जिल्हा अशी चंद्रपूरची कीर्ती सर्वदूर पोहचवावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
चंद्रपूर तालुक्‍यातील चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्र व संशोधन केंद्रातील निवासी इमारतीचा पायाभरणी सोहळा वित्‍त व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज ‘ पार पडला. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे शासन या उपक्रमांतर्गत या महत्वाच्या केंद्राची पायाभरणी वन विभागाशी संबंधित पाच नागरीकांच्या हस्ते केले. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बालपांडे, प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा उपवनसंरक्षक आर. टी. धाबेकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे, पं.स. उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावने, उपसरपंच सोमा निमगडे आदी उपस्थित होते.
यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला देशाच्या पातळीवर नावलौकिक मिळविण्यासाठी त्रीसुत्री जाहीर केली. यामध्ये रोजगारयुक्त जिल्हा, हागणदारी मुक्त जिल्हा व व्यसनमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. बांबू प्रशिक्षण केंद्र त्यादृष्टीने रोजगार निर्मिती महत्वाची सुरुवात असल्याचे ते म्हणाले.
बांबू प्रशिक्षण केंद्र परिसरातील गावांना रोजगार उपलब्ध करून देणारे महत्वाचे केंद्र आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेला बांबू केवळ विविध वस्तू तयार करून विकण्यासाठी नाही तर या बांबूचा कौशल्यपूर्ण वापर करणारा जिल्हा म्हणून गौरव वाढविण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. बांबूचा चांगला उपयोग केल्यास चांगला रोजगार यातून मिळणार आहे. या केंद्राच्या आधुनिकतेसाठी टाटा ट्रस्टसोबत आपण करार केला. ट्रस्टने केंद्राच्या आराखड्यासाठी 2 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बांबू प्रशिक्षण केंद्रासोबतच चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बॅाटनीकल गार्डन, सैनिक शाळा अशी विकासाची अनेक कामे मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहा फुलापासून पंचतारांकीत हॅाटेलमध्ये विकता येतील अशा काही वस्तू बनविता येतील का यासाठी प्रयत्‍न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले. सुरूवातील कुदळ मारून तथा नामफलकाचे अनावरण करून इमारतीची पायाभरणी करण्‍यात आली आहे. या कार्यक्रमास चिचपल्ली येथील नागरीक तथा वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.