सात गावातील तेंदूपानांना बाजारभावानुसार सर्वाधिक दर

0
6

गोंदिया दि. 7: जंगलातून निघणाऱ्या तेंदूपानाच्या व्यवहारात ग्रुफ आॅफ ग्रामसभेने एकाच कंत्राटदाराला कंत्राट दिला. मात्र त्यातून बाहेर पडलेल्या गावांना ई-निविदेच्या माध्यमातून जास्त नफा झाला आहे. त्यांना आमंत्रित निविदा कार्यक्रमांमुळे त्या गावांना सध्याच्या बाजारभावानुसार एक कोटी १० हजार २९५ रूपये एवढी विक्रमी किंमत प्राप्त झाली.
सन २०१७ तेंदूपत्ता हंगामात जिल्ह्यातील सामूहिक वनाधिकार प्राप्त गाव चुटिया (लोधीटोला), तेढा, कोयलारी, गोपालटोली, पांढरी, महाका, व येडमागोंदी येथील ग्रामसभेच्या माध्यमाने संकलित होणारा तेंदूपत्ता विक्रीसाठी ग्रृप आॅफ ग्रामसभेने विक्री प्रक्रिया कार्यान्वित केली नाही. त्यामुळे सदर गावांतील तेंदूपत्ता विक्रीसाठी आवश्यक मदत उपलब्ध करविण्यासाठी वन विभागाने इच्छुक खरेदीदारांकडून बंद लिफाफ्यात निविदा आमंत्रित केली. यात संपूर्ण निविदा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने क्रियान्वित करण्यात आली.
वन विभागाद्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या सहायतेमुळे तेंदूपाने विक्री करणाऱ्या सात वन अधिकार मान्य गावांत तेंदूपाने विक्रीसाठी आजच्या बाजारभावानुसार सर्वाधिक दर मिळाले आहे. यात गोंदिया तालुक्याच्या चुटिया (लोधीटोला) येथे घोषित उत्पादन १४० बॅग, प्रति बॅगचा दर ११ हजार ५८३ व निविदा दर १६ लाख २१ हजार ६२०, गोरेगाव वनक्षेत्रातील तेढा येथे २५ बॅग, प्रति बॅगचे दर १० हजार ५३९ व निविदा किंमत दोन लाख ६३ हजार ४७५, सडक-अर्जुनी येथील कोयलारी येथे १२० बॅग, प्रति बॅगचे दर १३ हजार ६८९ रूपये व प्राप्त निविदा दर १६ लाख ४२ हजार ६८०, पांढरी येथे पाच बॅग, प्रति बॅगचे दर १३ हजार २२१ व प्राप्त निविदा दर ६६ हजार १०५, तसेच सडक-अर्जुनी येथील गोपालटोली येथे पाच बॅग, प्रति बॅगचे दर १३ हजार २२१ व प्राप्त निविदा दर ६६ हजार १०५, देवरी वनक्षेत्राच्या महका-चिचगड येथे ८० बॅग, प्रति बॅगचे दर १५ हजार ५५२ व निविदा दर १२ लाख ४४ हजार १६०, देवरी तालुक्याच्याच येडमागोंदी येथे ३५० बॅगसाठी प्रति बॅगचे दर १४ हजार ५८९ व निविदा दर ५१ लाख सहा हजार १५० रूपये, अशी एकूण एक कोटी १० हजार २९५ निविदा किंमत आहे.उर्वरित ३१ वनहक्क मान्य गावांतील तेंदूपानांची विक्री ही ‘ग्रुप आॅफ ग्रामसभा’ या घटकाने अपारदर्शक पद्धतीने बाजार किंमतीच्या तुलनेत अत्यंत कमी दरात देवरी तालुक्याकरिता नऊ हजार ३१२ रूपये प्रति प्रमाण गोणी व सडक-अर्जुनी तालुक्याकरिता आठ हजार ३३१ रूपये प्रति प्रमाण गोणी विक्री केलेला आहे.