बिनागुंडाच्या धबधब्यात बुडून भामरागडच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

0
12

गडचिरोली,दि. १७: जिल्ह्यातील भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जामी यांचा बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारला(दि.१६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. आर. एल. जामी हे २० मार्च २०१६ रोजी बंदपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले होते. मागच्या महिन्यात सेवेचे कंत्राट संपल्याने त्यांनी मुदतवाढीसाठी आयुक्तांकडे अर्ज केला होता. १६ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी भामरागडला आले होते. त्यांच्यासह भामरागड येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बिनागुंडा येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. धबधब्याच्या पाण्यात सर्वजण अंघोळ करीत असतानाच डॉ. आर. एल. जामी खोल पाण्यात गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वर्षभराच्या कालावधीत डॉ.जामी यांनी लोकप्रियता मिळविली होती. मूळचे नागालँड राज्यातील रहिवासी असलेले डॉ.जामी यांनी दुर्गम भागात मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डॉ.जामी यांना पोहता येत होते. असे असताना ते बुडाले कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की, घातपात आहे, याविषयी चौकशी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.