कृषी वीजपंपाना बसविले कॅपासिटर

0
36

गोंदिया,दि.19 : जिल्ह्यात यंदा रबी पीक घेतले जात असल्याने मोटारपंपावर लोड येत आहे. कमी दाबामुळे अनेक मोटारपंपांत बिघाड होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वीज वितरण कंपनीने १४ उपकेंद्रांवर २५ एमव्हीएआरचे तर ११ केव्ही लाईनवर ७५ ठिकाणी ३६ एमव्हीएआरचे कॅपेसिटर बसविले आहे. त्यामुळे आता काही शेतकऱ्यांंना शेतपिकाला सहजरीत्या पाणी देण्यासाठी मदत होत आहे.

विजेच्या कमी दाबाने मोटारपंपांत बिघाड येतो. तसेच ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती, एलटी लाईन, जम्परींगची दुरूस्ती करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जाते. कमी दाबावर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पंपाला कॅपेसिटर बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता जे.एम.पारधी, अधिक्षक अभियंता लिलाधर बोरीकर, देवरीचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे व सहाय्यक महाव्यवस्थापक असीत ढाकणेकर यांंनी अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या कोसमतोंडी येथे 15० शेतकऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत कमी दाबामुळे मोटारपंप निकामी होऊ नये यासाठी कॅपेसिटर लावण्याचे आवाहन करण्यात आले. या कॅपेसिटरमुळे इलेक्ट्रीक सिस्टमला आवश्यक रिअ‍ॅक्टीव्ह कॅम्पेशेसन वाढविण्यास मदत होते.शेतकऱ्यांनी शेतीपंपाला एलटी कॅपेसिटर लावावे. ३ एचपी च्या मोटारपंपला १ केव्हीआर, ५ एचपीच्या मोटारपंपला २ केव्हीआर कॅपेसिटर लावावे, असे मुख्य अभियंता पारधी यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव या चार तालुक्यातील एलटी लाईनवर वीज वितरण कंपनीने कॅपेसिटर लावल्यामुळे १० ते १५ व्होल्ट त्वरीत वाढले आहे. त्यामुळे कमी दाबावर तात्पुरता तोडगा काढण्यात काही प्रमाणात यश आल्याचे मुख्य अभियंता पारधी यांनी सांगितले. ११ केव्हीच्या वाहिन्यांवर जास्त लोड येत असल्याने १५० अ‍ॅम्पीयर करंट आहे. तेथे लींक लाईन जुळे वाहीणी टाकून लोड बायफरकेट (वाटले) केले जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १५० ते २०० शेतकऱ्यांनी हे कॅपेसिटर बसविल्यामुळे त्यांच्या कृषीपंपाला आधी ३०० व्होल्ट मिळत होते ते आता वाढून ४०० व्होल्ट मिळत आहे.