अशोका बिल्डकामचा महामार्ग अपूर्णच;शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

0
9

साकोली दि.19: शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आजही कित्येक बाबतीत अपुरा असून शहरीकरण व एनएचएआईच्या निर्देशानुसार आजपर्यत सेंटरलाईन व तिन्ही बोगद्यात दिवे नाहीत. त्यामुळे रात्री चक्क अंधारात या बोगद्यात चोरी, लूटपाट, छेडछाड या प्रकारच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय महामार्ग विकास प्राधिकरणअंतर्गत अशोका हाईवेज बिल्डकामने काही वर्षापूर्वी काम सुरू करून सेंदूरवाफा येथे टोलप्लाझाही सुरू केला. परंतु साकोली लाखांदूर टी-पॉईंट (मुख्य बोगदा), उपजिल्हा रुग्णालयासमोर व सेंदूरवाफा पॉलिटेक्निक चौक या तिन्ही बोगद्यात दिव्यांची सोय केली नाही. त्यामुळे या तिन्ही बोगद्यात रात्री अंधार राहात असून चोरी, लुटमार, विद्यार्थिनी व महिलांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कंत्राटदाराने टोल नाक्यावर भरपूर दिव्यांची झगमगाट केली असून मुख्य मार्गाच्या सेंटरलाईन, उड्डाण पुलावर महामार्ग परिपत्रकानुसार एकही शहरी भागातून पथदिवे लावले नाहीत. दोन्ही सर्व्हिस रोड हे छोटी वाहने, दुचाकीसाठी असून पादचार्‍यांसाठी रोडच्या बाजूस साधारण फुटपाथची व्यवस्था नाही. या सर्व्हिस रोडने मोठे वाहने जात असून सायकलस्वार विद्यार्थी, पादचारी येथे गोंधळून अपघात होण्याची शक्यता असते. जुने बसस्थानक, तहसीलचे दोन्ही बसस्टॉप येथे प्रवासी भर उन्हात व पावसात उभे रहातात, परंतु साधा प्रवासी निवारा तयार केला नाही. अशोका बिल्डकामने तिन्ही बोगद्यात विद्युत व्यवस्था, महामार्गावर विद्युत पथदिवे, प्रवासी निवारा त्वरित करण्याची मागणी शिवसेना, युवासेनेचे किशोर चन्ने, संदीप वाघाये, प्रकाश मेश्राम, प्रणय कांबळे, नरेश करंजेकर यांनी केली असून काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.