स्मार्ट खेड्यासाठीं जिल्ह्यातील ८ गावामंध्ये स्पर्धा

0
8

गोंदिया,-,दि.19 :राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागातर्गंंत स्मार्टखेडे ही संकल्पना हाती घेण्यात आली असून तालुकापातळीपासून जिल्हापातळी,विभागीय पातळी व राज्यस्तरावर जे गाव आपले स्मार्टपणा टिकवून ठेवेल त्या गावाची स्मार्ट खेडे म्हणून निवड होणार आहे.सोबतच लाखो रुपयाचे पुरस्कार सुध्दा दिले जाणार आहे.त्या मोहिमेंतर्गंत गोंदिया जिल्ह्यात जिल्हापातळीवर प्रत्येक तालुक्यातून १ याप्रमाणे ८ गावांची निवड करण्यात आली.त्या निवडलेल्या गावांमधून पहिल्या तीन गावांची निवड करण्यात येणार असून जिल्हास्तरीय समितीने १० ते १३ एप्रिल दरम्यान या गावांची पाहणी केली आहे.या पाहणीचा निकाल २१ एप्रिल नंतर जाहिर होणार असून गोंदिया जिल्ह्यातील स्मार्ट खेड्याची घोषणा होणार आहे.
या योजनेमध्ये जिल्हास्तरासाठी निवड केलेल्या गावामध्ये गोंदिया तालुक्यातील कारंजा,तिरोडा तालुक्यातील बोदा,आमगाव तालुक्यातील रामाटोला,सालेकसा तालुक्यातील गांधीटोला,देवरी तालुक्यातील जेठभावडा,गोरेगाव तालुक्यातील पाथरी,सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दाभणा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.यात आमगाव तालुक्यातील रामाटोला हे गाव स्वच्छता अभियानात यशवंत पुरस्काराचे मानकरी आधीपासूनच राहिले आहे.जेठभावडा हे गाव डिजिटल योजनांच्या वापरात आघाडीवर असे आहे.तर गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव खासदार प्रफुल पटेल यांचे दत्तक गाव असून विकास कामाच्या योजनेत आघाडीवर आहे.रामाटोला,पाथरी व जेठभावडा या तिन्ही गावामध्ये स्मार्ट खेडे होण्यासाठी चांगली स्पर्धा असल्याचे त्या गावातील नियोजनावरुन बघावयास मिळते.या ८ ही गावांची पाहणी पंचायत विभागाचे उपमुकाअ राजेश बागडे यांच्यानेतृत्वातील जिल्हास्तरीय समितींने नुकतीच केली असून आपला अहवाल मुकाअ डॉ.चंद्रकांत पुलकूंडवार यांच्याकडे दिला जाणार आहे.गावांच्या निवडीसाठी तपासणी करतांना गावातील स्वच्छतेवर २० गुण,आरोग्य व पायाभूत सुविधांचा वापर व व्यवस्थापानावर २५ गुण, सामाजिक दायित्वसोबतच ग्रामसभा व इतर योजनात सक्रिय सहभाग आणि करवसुलीमध्ये नागरिकांचा सहभाग २० गुण,अपारंपारिक उर्जा व पर्यावरणावर २० गुण आणि पारदर्शक प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापरावर १५ गुण ठरविण्यात आले असून या १०० गुणांत पहिल्या क्रमांकावर येणारे गाव हे स्मार्ट खेडे म्हणून ओळखले जाणार आहे.