देवरी एफडीसीएमच्या डेपोला भीषण आग

0
13

देवरी (गोंदिया),दि.20 – गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या वनविकास महामंडळाच्या लाकूड आगाराला आज चारच्या सुमारास भीषण आग लागून लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वन व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिमतीला नागरिक धावून गेल्याने मोठी वित्तहानी टळली. या अग्निकांडामुळे वनविकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे पितळ  उघड पडले. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरू होते.

सविस्तर असे की, देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत वनविकास महामंडळाचे विश्रामगृह, कार्यालय आणि लाकूड आगार आहे. या आगाराच्या दक्षिणेला राष्ट्रीय महामार्ग असून लाकूड ठेवलेल्या जागेत मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा साचला होता. उल्लेखनीय म्हणजे हवामान खात्याने नुकतेच उष्णतेच्या दाहकतेचा इशारा देत रेड अलर्ट घोषित केले होते. परंतु, या रेड अलर्टचा कोणताही परिणाम वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर झालेला नसल्याचे या प्रकरणावरून दिसून येते. लाकूड आगाराला लागून असलेल्या नालीमध्ये सुद्धा पालापाचोळा साचला होता. त्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली असती तर हे अग्निकांड टाळता आले असते. उल्लेखनीय म्हणजे ज्या ठिकाणावरून ही आग लागली तिथून सरळरेषेत नजीकच या विभागाचे कार्यालय आहे. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आग ही तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, याविषयी उलटसुलट चर्चा घटनास्थळी होती. विशेष म्हणजे या विभागाची आपात्कालीन व्यवस्थासु्द्धा वाळवीग्रस्त दिसून आली. या विभागाने फायरलाइनचे काम वेळीच केले असते तर लाखोचे झालेले नुकसान टाळता आले असते.

या आगारात सुमारे 2 हजारावर लाकडाच्या बिट्ट्या होत्या.याशिवाय दीड हजारावर बांबूचे बंडल असल्याचे सांगण्यात येते. या आगीत सुमारे 60 ते 70 बिट्ट्या जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. ही आग एवढी भीषण होती की तेथे असलेल्या झाडांना 30 फुट उंचीवर आग लागल्याचे दिसून येत होते. वनविभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे पाहून देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे हे माहिती मिळताच आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने वाळलेल्या इतर बिट्ट्या अागीपासून दूर करण्यात आल्या. वृत्त लिहिपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सूरूच होते. गावातील टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु, एवढी प्रचंड आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मात्र पोचल्या नव्हत्या.