वनहक्क पट्ट्यांची प्रकरणे त्वरित निकाली काढा

0
9

गोंदिया,दि.22 : जिल्ह्यातील वैयक्तिक व सामूहिक वनहक्क जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप तातडीने करण्यासाठी महसूल विभागाने वन विभागाच्या सहकार्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु न ही प्रकरणे तातडीने निकाली काढावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील वनहक्क जमिनीच्या पट्टे वाटपाच्या प्रकरणांचा आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, देवरी उपविभागीय अधिकारी एम.एच.टोणगावकर, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी.मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण मिहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बडोले पुढे म्हणाले, तिरोडा शहरातील झुडूपी जंगल प्रकरणाचा केंद्र शासनाकडे योग्य पाठपुरावा करुन ज्याप्रमाणे निपटारा करण्यात आला, त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील संजयनगर येथील झुडूपी जंगल प्रकरणाचा सुध्दा निपटारा करण्यास त्यांनी सांगितले.

आ.रहांगडाले यांनी जिल्ह्यातील वनहक्क पट्टे जमीनधारकांना पीक कर्ज व पीक विमा मंजूर झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क दाव्यांची संख्या ३९५ इतकी असून मंजूर गटांची संख्या ८४३ इतकी आहे. यांना ३८६७६.५६ हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे. प्रलंबीत असलेल्या २५७ दाव्यात तपासणीचे काम सुरु असल्याचे त्यांनी उपजिल्हाधिकारी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात वैयक्तिक वनहक्काचे ग्रामस्तरीय गावे १५९०, उपविभागीयस्तरीय समितीकडे ३५१२, तर जिल्हास्तरीय समितीकडे ९८३ दावे प्रलंबित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी यावेळी दिली. एकूण प्राप्त प्रकरणांपैकी निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या १५६५४ इतकी असून वाटप केलेल्या टायटलची संख्या ८४३१ इतकी आहे. ४८११,२३१ हेक्टर टायटल्सच्या जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.