जिल्ह्यात कोकणा ठरले स्मार्टखेडे,मिळणार 50 लाखाचा निधी

0
12

गोंदिया,दि.30-राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागातर्गंंत स्मार्टखेडे ही संकल्पना हाती घेण्यात आली असून तालुकापातळीपासून जिल्हापातळी,विभागीय पातळी व राज्यस्तरावर जे गाव आपले स्मार्टपणा टिकवून ठेवेल त्या गावाची स्मार्ट खेडे म्हणून निवड होणार आहे.सोबतच लाखो रुपयाचे पुरस्कार सुध्दा दिले जाणार आहे.त्या मोहिमेंतर्गंत गोंदिया जिल्ह्यातून सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा हे गाव स्मार्टखेडे ठरले आहे.या गावाला तालुकास्तरावरील 10 लाख व जिल्हास्तरावरील 40 लाख असा 50 लाख रुपयाचा पुरस्कार उद्या 1 मे रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्हापातळीवर प्रत्येक तालुक्यातून १ याप्रमाणे ८ गावांची निवड करण्यात आली होती.त्या निवडलेल्या गावांची जिल्हास्तरीय समितीने १० ते १३ एप्रिल दरम्यान पाहणी केली होती.त्या पाहणीत कोकणा या गावाने प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सादर केल्याने गावाची निवड गोंदिया जिल्ह्यातील स्मार्ट खेडे म्हणून झाल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी दिली आहे.
या स्पर्धेमध्ये गोंदिया तालुक्यातील कारंजा,तिरोडा तालुक्यातील बोदा,आमगाव तालुक्यातील रामाटोला,सालेकसा तालुक्यातील गांधीटोला,देवरी तालुक्यातील जेठभावडा,गोरेगाव तालुक्यातील पाथरी,सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दाभणा ग्रामपंचायतीचा समावेश होता. तपासणी करतांना गावातील स्वच्छतेवर २० गुण,आरोग्य व पायाभूत सुविधांचा वापर व व्यवस्थापानावर २५ गुण, सामाजिक दायित्वसोबतच ग्रामसभा व इतर योजनात सक्रिय सहभाग आणि करवसुलीमध्ये नागरिकांचा सहभाग २० गुण,अपारंपारिक उर्जा व पर्यावरणावर २० गुण आणि पारदर्शक प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापरावर १५ गुण ठरविण्यात आले होते.त्यानुसार सर्वाधिक गुण मिळविणार्या गावाची निवड झाली आहे.