वृक्ष लागवडीसोबतच संगोपनाचे नियोजन करावे- अभिमन्यू काळे

0
14

गोंदिया,दि.५ : पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाण्याची सहज उपलब्धता असणाऱ्या कालव्याच्या दुतर्फा भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. विविध यंत्रणांनी वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संगोपनाचे नियोजन देखील करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
येत्या १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत ४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदिपकुमार बडगे, उपजिल्हाधिकारी आर.डी.शिंदे, सहायक वनसंरक्षक श्री.बिसेन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, पर्यावरणपुरक वृक्षांची जास्तीत जास्त झाडे लावावी. सोबत पक्षांना त्या झाडांची फळे खाता येतील अशी झाडे मोठ्या प्रमाणात लावावी. तेंदूची झाडे सुध्दा लावावी, त्यामुळे तेंदूची फळे व पानाचा उपयोग करता येईल. तालुका क्रीडा संकुल परिसरात वडाच्या वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे पूर्वी तयार करुन ठेवावी.
विविध यंत्रणांना ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे त्याचे अक्षांश व रेखांश उपलब्ध करुन दयावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, गोंदिया शहराच्या वळण रस्त्याच्या दुतर्फा लाल व पिवळा पळस वृक्षांची रोपे लावावी, असे ते म्हणाले.
सामाजिक वनीकरण विभाग २० लाख रोपे तयार करणार असल्याची माहिती श्री.बडगे यांनी दिली.
येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यात राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड १ ते ७ जुलै दरम्यान करण्यात येणार असून जिल्ह्यात ११ लाख ४५ हजार वृक्ष लागवड करण्यात येईल. यामध्ये वन विभाग ४१ हजार ७००, सामाजिक वनीकरण विभाग १५ हजार, वन विकास महामंडळ १८ हजार, पंचायत विभाग २ लाख २ हजार, कृषी विभाग ३७ हजार ७५०, नगर विकास १५ हजार १००, सार्वजनिक बांधकाम १५ हजार १००, जलसंपदा विभाग १५ हजार १००, सहकार व पणन विभाग ७५५०, शालेय शिक्षण विभाग ७५५०, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ३७७५, पोलीस विभाग ३०२०, आदिवासी विकास विभाग ३७७५, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग व वैद्यकीय विभाग प्रत्येकी १५१० यासह अन्य यंत्रणांना सुध्दा उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अदानी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ११ लाख ४५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक श्री.बिसेन यांनी दिली. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.