कला ही दैवी देणगी नसून सहजप्रवृत्ती होय-सुधाकर गायधनी

0
48

विभागीय माहिती केंद्रामध्ये व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, दि. 5 :  व्यंगचित्र एक कला आहे. तसेच मानवाच्या सृजनशिलतेचा तो एक अविष्कार आहे. प्रयत्नाने व प्रतिभेने या कलेची बीजे फुलवून मनुष्य फार मोठा चित्रकार होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी यांनी केले.
कार्टूनिस्ट झोन व विभागीय माहिती केंद्र यांच्या समन्वयाने जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने विभागीय माहिती केंद्रामध्ये व्यंगचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध व्यंगचित्रकार शशिकांत सप्रे, कार्टूनिस्ट झोनचे अध्यक्ष विनय चानेकर, सचिव राजीव गायकवाड उपस्थित होते.
व्यंगचित्र केवळ विनोदाचे साधन नसून त्यामधून समाजातील वास्तव विनोदी पद्धतीने व्यंगचित्रकार समाजापुढे मांडत असतो. यामुळेच कलेतील व्यंगचित्रप्रकार महत्त्वाचा आहे. कलेने मनुष्याला व मनुष्याने कलाक्षेत्राला उत्तरोत्तर समृद्ध केले आहे. कला ही जन्मजात दैवी देणगी नसून ती मानवाची सहजप्रवृत्ती आहे. असे सांगत गायधनी पुढे म्हणाले की,चित्रशैली मानवाने आपल्या आदी शैलीतून निर्माण केलेली आहे. तसेच चित्रकला फार पुर्वीपासून परंपरेने चालत आलेली सहजसुंदर कला आहे. यामधुनच व्यंगचित्राची निर्मिती झालेली आहे. जगामध्ये व्यंगचित्र व व्यंगचित्रकारांना अतिशय महत्व असून त्यांच्या कार्यशैलीमधुन सामाजिक जाणिवेचा संदेश समाजापर्यंत पोहचत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वर्तमानामध्ये सामाजिक संदेश वाहकाची भूमिका व्यंगचित्रकार पार पाडत आहेत.त्यांच्या चित्रांमधून देण्यात येणारा संदेश इतिहासामध्ये नोंदविला जात असल्याने त्यांचे कार्य अनुकरणीय आहे. कुंचल्यातुन चित्र साकारत असतांना व्यंगचित्रामधून सामाजिक व्यंग दूरकरण्यासाठी प्रयत्न करावा असा मोलाचा संदेश प्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंगचित्रकार शशिकांत सप्रे यांनी तर  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश गव्हाळे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, विविध मान्यवर तसेच प्रेक्षक उपस्थित होते.