वनविभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांसह आमदारांची भेट

0
12

गोंदिया,दि.07 : वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची पाहणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी करुन चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून  गोंदियावरुन पुढच्या प्रवासासाठी रवाना केले.त्याआधी देवरी येथे देवरी आमगाव मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी  झेंड़ीं दाखवली.वनमंत्रीच्या संकल्पनेतून शासनाने वृक्ष लागवडीचे संकल्प घेतले  असून जनजागृती करणारे चित्ररथ तिरोड्यात येताच वनविभागाने तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते झेंडी दाखविण्यात आली.यावेळी चतुर्भुज बिसेन, भूमेश्वर रहांगडाले,अनुप बोपचे,सारंग मानकर, दिलेश पारधी  वनपरिक्षेत्राधिकारी  विजय कदम व  वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
गोंदियात आमदार गोपालदास अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, सहायक वन संरक्षक श्री.बिसेन, श्री.शेंडे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.
बिघडलेले पर्यावरण संतुलन आणि जागतिक तापमान वाढीमुळे वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज झाली आहे. येत्या तीन वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीत लोकसहभाग मिळावा आणि मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप यावे यासाठी वन विभागाने चित्ररथ तयार केला असून 1 मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
वन विभागाचा हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. हा चित्ररथ राज्यभर भ्रमण करणार असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे व ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथाच्या मागच्या भागात मोठी डिजीटल स्क्रीन असून 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. 1 मे ते 30 जून पर्यंत हा चित्ररथ चांदा ते बांधा असा महाराष्ट्रभर प्रवास करुन सर्वच जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.