शिवसेना पक्षप्रमुखांनी जाणून घेतल्या शेतकºयांच्या व्यथा!

0
12

अकोला ,दि. 15: राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेनेने राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अकोल्यात दाखल होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या.होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरण्यास सज्ज झाली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानची सुरुवात मराठवाड्यात केली. त्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील २० विधानसभा मतदारसंघात जाऊन शिवसेनेचे नेते, आमदार, नगरसेवक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. याच अभियानाचा भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आकोट, बाळापूर आणि पातूर या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. तूर खरेदी, वीज जोडणी, कर्जमाफी आदी विषयांवर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.