पांडे महाल बचावासाठी स्वाक्षरी अभियान

0
27

भंडारा,दि.30 -येथील इतिहासकालीन वास्तु म्हणून जिल्ह्याची ओळख असलेल्या पांडे महल वाचविण्यासाठी सर्वपक्षीय संघटना व शहरातील सुज्ञ नागरिकांच्यावतीने पांडे महाल बचाव स्वाक्षरी अभियान आज ३० मे रोजी गांधी चौक येथे नगरपरिषदे समोर ११ ते ५ या वेळात राबविण्यात आले.शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. पांडे महलाच्या खरेदी विक्रीची रजिस्ट्री विकृत मानसीकतेचे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आली. सदर रजिस्ट्री रद्द करून खरेदीदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी आज शहरातील सर्व पक्षीय संघटना व सामाजिक संस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. परंतु १२ दिवस लोटूनही अद्यापही जिल्हा प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने स्वाक्षरी अभियान सुरु करण्यात आले आहे.