वादळाने उडविले पोलिसांच्या निवास्थानाचे छत;वीज कोसळून चार बैलांचा मृत्यू

0
7

गडचिरोली,दि.05- मुलचेरा तालुक्यात आज सकाळीच आलेल्या वादळाचा फटका बोलेपल्ली येथील पोलिसांसह गोमणी येथील नागरिकांनाही बसला.तर एटापल्ली तालुक्यात वीज कोसळून जनावरे दगावली गेली. वादळामुळे बोलेपल्ली पोलिस मदत केंद्रातील निवास्थानांच्या टिनाचे छत उडाले, तर गोमणीनजीकच्या नाल्याजवळ झाड कोसळल्याने वाहतूक प्रभावीत झाली होती.बोलेपल्ली येथील पोलिस मदत केंद्राच्या आवारात पोलिसांना वास्तव्य करण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात आले आहेत. तेथे अनेक पोलिस राहतात. मात्र आज सकाळी जोरदार वादळ आल्यामुळे निवासस्थानांच्या छतावरील टिनपत्रे उडाली. बाजूला लावलेली टिनपत्रेही उडाल्याने पोलिसांचे संसार उघड्यावर आले. वादळ थांबल्यानंतर पोलिसांना टिनपत्रे लावण्यात व्यस्त राहावे लागले.गोमणीपासून अर्धा किमी अंतरावरील नाल्याजवळच्या विद्युत जनित्रावर सकाळी एक झाड कोसळले. परिणामी विजेचे खांब वाकून वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय वाहतूकही तब्बल तीन तास ठप्प होती. गावकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

एटापल्ली तालुक्यात गावाबाहेर चरण्यास गेलेले चार बैल वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कृष्णार गावात घडली.कृष्णार येथील शेतकरी डोलू हिचामी व सुरेश सीताराम कुळसंगे यांनी आज सकाळी त्यांच्या मालकीचे बैल गावाबाहेरील शेताकडे चरण्यास सोडले होते. साडेसात वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळ व पावसास सुरुवात झाली. काही वेळाने विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळून चारही बैलांचा मृत्यू झाला. पाऊस थांबल्यानंतर काही नागरिक आंबे वेचण्याकरिता शेताकडे गेले असता त्यांना एकाच ठिकाणी चार बैल मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती डोलू हिचामी व सुरेश कुळसंगे यांना दिली. डोलू हिचामी यांच्या मालकीचे ३, तर सुरेश कुळसंगे यांचा एक बैल ऐन शेतीच्या हंगामाच्या वेळी मृत्यूमुखी पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.