शेतकरी बांधवाकरीता अपघात विमा योजना

0
7

गोंदिया, दि.8 : शेतीव्यवसाय करतांना शेतकरी बांधवाना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अपघातामुळे अपंगत्व येवू शकते किंवा मृत्यूही ओढवू शकतो. यामुळे अपघाती कुटूंबातील उत्पन्नाचे साधन बंद होवू शकते अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटूंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना कार्यन्वित केली आहे. या योजनेकरीता विमा सल्लागार कंपनीसोबत करार करण्यात आला असून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास नुकसान भरपाई रक्कम एक लक्ष रुपये दिली जाते. तसेच अपघातामध्ये एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनूसार खातेदार शेतकरी असावा. शेतकरी म्हणून त्याच्या नावाचा समावेश असलेला सात बारा व संबंधित फेर फार नोंद असावी. शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठयाकडील गावनमूना नं. 6 नूसार मंजूर झालेली वारसाची नोंद असावी. वारसदार म्हणून मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकाची नोंद असावी. विमाप्रस्ताव शेतकरी/वारसदाराने विमा कालावधीत विहीत केलेल्या कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी गोरेगाव, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांचेशी संपर्क साधावा असे गोरेगाव तालुका कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.