नाना पटोले :विकासात परिवर्तनाची नांदी

0
11

भंडारा ,दि.12: बावनथडी, गोसेखुर्द यासह लहान मोठ्या प्रकल्पांना नवसंजीवनी देवून कामे धडाक्यात सुरु आहेत. विरोधकांनी तीस वर्षांचा कालावधी व सन २०१४पासून तीन वर्षांचा कालावधी तपासावा. त्यांना त्यांचे प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळेल. येणाऱ्या काळात विविध विभागातून विकासाच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी दिसून येईल असे आशावादी प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.

रविवारी सकाळी ११ वाजता एमईसीएल व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भंडारा येथील श्री गणेश हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सबका साथ सबका विकास संमेलनात खासदार पटोले मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष मो. तारिक कुरेशी, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदिप पडोळे, पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, एमईसीएलचे पदाधिकारी डी. पी. द्विवेदी, निरंजन मिश्रा आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, बावनथडी हा महाराष्ट्रातील एकमेव असा प्रकल्प आहे, ज्याला एकमुस्त एक हजार ६०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. गोसेखुर्द धरणाच्या बाबतीतही शेतकऱ्यांना मोबदला न देता पाणी अडविण्यात आले होते. पुनर्वसन केल्याशिवाय धरणाचे पाणी अडवू नये ही भुमिका मागेही घेतली होती. सत्तेत आल्यानंतर जवळपास आठ हजार कोटींची कामे गोसेखुर्द मध्ये खेचून आणली आहेत. २०१९ पर्यंत धरणाचे काम पूर्णत्वास येवून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्याचे ध्येय आहे.

समारोपप्रसंगी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोबीज या इव्हेंटच्या रुपाली बिरे यांनी केले तर आभार एनईसीएलचे निरंजन मिश्रा यांनी मानले. या संमेलनाला भाजपचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.