स्वाभिमानीचे हरमोळ शिवारात घसरगुंडी आंदोलन

0
14

बुलडाणा,दि.18 – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रूपयांपर्यंत कर्ज देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहे. मात्र बॅंक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबंधित बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानीने राणा चंदन यांच्या नेतृत्वात आज (रविवार) मोताळा तालुक्‍यातील हरमोळ शिवारात मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरगुंडी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ अध्यक्ष राणा चंदन, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, विजय बोराडे, गजानन पवार, रशीद पटेल, गोपाल पाटील, जुबेर पटेल, राजू पन्हाळकर, मुकुंदा शिंबरे, शेख युनूस, मो. हारून, सय्यद इम्रान, संदिप नवले, नितीन पुरभे, अनिस पठाण, सतीश नवले, कैलास सोनुने, नितीन देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते. दरम्यान, बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. शासनाचे निर्देश असतानाही शेतकऱ्यांना दहा हजार रूपयांपर्यंतचे कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राणा चंदन यांच्या नेतृत्वात मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरगुंडी आंदोलन करण्यात आले.