घटनात्मक अधिकारासाठी ओबीसींचा लढा- डॉ.खुशाल बोपचे

0
9

भंडारा,दि.२५-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील ओबीसींना संघटित करुन घटनात्मक अधिकारासाठी काम करीत असलेल्या विविध ओबीसी संघटनांना एकसुत्रात बांधून राज्यघटनेतील 340 व्या कलमांनुसार हक्क अधिकार मिळावा यासाठी हा लढा सुरु करण्यात आला आहे. या ओबीसींच्या लढ्यात सहभागी होऊन सत्ताधारी सरकारवर ओबीसींनी आपल्या शक्तीचा परिचय देत दबावतंत्राच्या माध्यमातून ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वय माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी केले. सर्किट हाऊस भंडारा येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसी अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकिला माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ संघटक खेमेंद्र कटरे, गुणेश्वर आरीकर, भंडारा जिल्हा संघटक डॉ.अजय तुमसरे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, भैय्याजी रडके आदी प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
डॉ.बोपचे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा सर्वाधिक ओबीसी समाजात मोडणारा आहे. शेतकरी समृध्द व्हावा यासाठी ओबीसी महासंघाने आधीपासूनच शेतकरी कर्जमुक्तीसोबतच स्वामीनाथन आयोगाची शिफारसी लागू करुन वयाच्या 60 वर्षानंतर पेंशन लागू करण्याची मागणी रेटून धरली आहे. ओबीसी समाज हा विविध जातीमध्ये विखुरला असल्याने संघटित होण्यासाठी वेळ लागत आहे, या संधीचा लाभ घेत काही उच्चवर्णीय ओबीसीमधील जातीजातीमध्ये मतभेद निर्माण करुन आपली पोळी शेकण्याचे काम करीत आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी सजग होऊन भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यात ओबीसी महासंघाची शाखा सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.त्यासाठी आपण भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात फिरण्यास तयार असल्याचे सांगत ज्या राज्यघटनेवर देश चालत आहे. न्यायव्यवस्था चालत आहे नव्हे तर न्यायव्यवस्थेलाच राज्यघटनेने तयार केले तीच न्यायव्यवस्था आज राज्यघटनवेर वरचढ होऊन असैवंधानिक निर्णय घेऊन या देशातील ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असल्याचेही सांगत याचे उदाहरण नाॅनक्रिमिलेयर असल्याचे म्हणाले. यासाठी आपण सर्वांनी ओबीसी चळवळीचे काम हे स्वार्थासाठी नव्हे तर मिशन म्हणून हाती घेऊन आपल्या शक्तीचा परिचय येत्या ७ आॅगस्टच्या दिल्लीतील दुसर्या महाधिवेशनात दाखविण्याचे आवाहन केले.यावेळी आमदार मधुकर कुकडे यांनी ओबीसी परिषदेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन संघटितपणे लढा देण्यासाठी सज्ज व्हावे असे सांगत शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी ओबीसी महासंघाने पुढाकार घ्यावे असे विचार मांडले. भैय्याजी लांबट,गोपाल सेलोकर,गुणेश्वर आरीकर आदींनीही विचार व्यक्त केले.प्रास्तविकात खेमेंद्र कटरे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका सांगत येत्या २८ जूनला आयोजित नागपूरातील ओबीसी परिषदेला ओबीसीतील सुज्ञांना सहभागी करुन नवी दिल्ली येथील दुसर्या महाधिवेशनासाठी प्रत्येक तालुक्यातून ओबीसींचे प्रतिनिधी नेण्यासंबधीच्या नियोजनावर माहिती दिली.संचालन भंडारा जिल्हा संघटक डॉ.अजय तुमसरे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते यांनी मानले. बैठकिला राजकुमार माटे, शब्बीरभाई पठाण,उमेश मोहतुरे,मनोज बोरकर, सदानंद इलमे, नीलकंठ कायते, तुळशीराम बोन्द्रे, डॉ महादेव महाजन, भूमिपाल टांगले, यादोरावजी मनापुरे, ईश्वर निकुडे,संजय आजबले, प्रभाकर कळंबे, अशोक गायधनी, माधवराव फसते, गोपाल नाकाडे, रमेश रोटके, शुभम गभणे, सुधाकर मोठलकर, धनराज साठवणे, यशवंत फुंडे, अजय हजारे, नरेश मदनकर, निश्चय दोनाडकर, उमेश शिंगनजुडे, संजय वनवे, जयेश बोरकर, डॉ शैलेश कुकडे, संजय निखाडे, अमोल चोपकर आदी उपस्थित होते.