विदर्भातील सिंचन प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा

0
12

 मुंबई, दि. 29 : विदर्भातील गोसी खुर्द, धोपेवाडा सिंचन प्रकल्प टप्पा दोन, बावनथडी प्रकल्प, धारगाव उपसा सिंचन प्रकल्प या प्रकल्पांचा तसेच या भागातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार नाना पटोले, आमदार डॉ. परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. व्ही. सुर्वे, गोसी खुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, श्री. दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षात गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सिंचन क्षमता 22 हजार हेक्टर वाढली आहे. 49 हजार हेक्टर वरून ही सिंचन क्षमता 62 हजार हेक्टर एवढी वाढली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकल्पातील आंभोरा, मोखाबर्डी, नेरला, आदी उपसा सिंचन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहेत. तसेच धारगाव सिंचन प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून विदर्भातील सुमारे 12 सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत.इतर प्रकल्पामधून धापेवाडा सिंचन प्रकल्पासाठी 80 कोटी रुपये देण्यास यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली. तसेच प्रकल्पाची पुनर्वसन कामे करत असताना पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांना प्राधान्य देण्याचे व ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या कामानाही गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

०००