दुग्धवाढीसाठी पशुपालकांना सहकार्य करणार- महादेव जानकर

0
9

गोंदिया,दि.२९ : शेतीपुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा महत्वाचा ठरणार आहे. पशुपालकांनी दुधाळ जनावरांचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन करावे. पशुपालकांना दुग्धवाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
२९ जून रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाअंतर्गत आयोजित कृती शिबिराचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, अर्जुनी/मोरगावचे पं.स.सभापती अरविंद शिवणकर, दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.वाणी, जिल्हा उपायुक्त श्री.शहारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच कामदेव कापगते यांची उपस्थिती होती.
श्री.जानकर यावेळी म्हणाले, १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जावून पशुपालकांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत. या योजनेमुळे निश्चितच दुग्धवाढीसाठी मदत होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे सांगून श्री.जानकर म्हणाले, चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले प्रोत्साहन राहणार आहे. पाळीव जनावरांसाठी सुध्दा ॲम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येईल. त्यामुळे आजारी दुधाळ जनावराला वेळीच उपचार करता येईल. राज्यात अशाप्रकारे २९८ ॲम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसाय हा एटीएम आहे. या व्यवसायामुळे पैसा हाती खेळत असतो. जिल्ह्यात मत्स्य विकासाला सुध्दा चालना देण्यात येईल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा केवळ अनुदानासाठी लाभ न घेता त्या योजना प्रभावीपणे राबविल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ओबीसी बांधवांसाठी सुध्दा या योजनांचा लाभ देण्यात येईल असे सांगितले.
पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा खेळता राहील. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरले जाणार आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केल्यास चांगले दिवस येण्यास मदत होईल. देवलगाव या गावाची निवड दुग्धवाढीसाठी पथदर्शी प्रकल्पात करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील दुग्धवाढीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना व दुग्ध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आनंद यांचेमार्फत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी ८ गाव असे एकूण ६४ गावामध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने निवड केलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे या कार्यमोहीम शिबिराचा शुभारंभ दुग्धविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
मान्यवरांनी दुधाळ जनावरांची पाहणी करुन पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गोंडाणे, डॉ.पटले यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच देवलगाव येथील ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे यांनी केले.