रेल्वेत अतिरिक्त शुल्काच्या वसुलीत घोळ

0
1

नागपूर,दि.04 – रेल्वे प्रवाशांकडून वसूल करण्यात येणारे अतिरिक्त शुल्क हे लगेज म्हणून दाखवून रेल्वेमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
रेल्वे ने प्रवास करणारे प्रवाशी अनेकवेळा काही कारणांमुळे सामान्य दर्जाचे तिकीट घेऊन स्लीपर कोच मध्ये प्रवास करतात. अशा वेळी तिकीट तपासणीस त्यांचे कडून फरकाची रक्कम वसूल करीत असतात. मात्र, अशा प्रकारे वसुल करण्यात आलेली रक्कम ही प्रवास भाडे म्हणून वसूल न करता लगेज म्हणून वसूल करण्याचा सर्रास प्रकार रेल्वेत बघायला मिळत आहे. जर प्रवासाचे भाडे चुकवले जात असेल तर ते लगेजच्या नावावर वसूल करण्याचे कारण काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रेल्वेचे तिकीट तपासनीस काही गैरव्यवहार तर करीत नसावे ना, अशी शंका  निर्माण झाली आहे. या व्यवहारामध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असण्याची शक्यता नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराची योग्य दखल घेऊन प्रवाशांची होणारी दिशाभूल थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.