अवैध दारू आणि सट्टा व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ;पोलिसांचा वसुलीवर भर

0
17

गोंदिया,दि.५- एकीकडे सरकार गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी अवैध धंद्याविरोधात राज्यात कठोर धोरण आखत असल्याचा दावा करीत असले तरी दुसरीकडे मात्र, गोंदिया शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने या अवैध धंद्यांचे उदात्तीकरण होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. परिणामी, सरकारचे गोंदिया पोलिसांवर नियंत्रण आहे की नाही, असा गंभीर प्रश्न गोंदियाकरांना पडला आहे. शहरात खुद्द पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू आणि सट्टा व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून या व्यवसायाच्या माध्यमातून गोंदिया पोलिसांचे अर्थकारण चांगलेच फळाला येत आहे.
राज्यासह संपूर्ण देशात सध्या दारू विक्रीला घेऊन गरमागरम चर्चा सुरू आहे. महामार्गाशेजारी दारू विक्रीबंदी मुळे अनेक देशीविदेशी दारूची दुकाने आणि बार सध्या बंद आहेत. जिल्ह्यात केवळ मोजक्या प्रमाणात परवानाधारक दारू दुकाने व बार सुरू आहेत. या प्रकारामुळे सर्वत्र अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या वृत्त असताना अनेक ठिकाणी पोलिसांची यशस्वी छापेमारीसुद्धा सुरू आहे. असे असताना मात्र, गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचे पाठबळ असल्याने अनेक अवैध दारू व्यावसायिक जिल्ह्यात दारूची वाहतूक करून शहरी भागासह ग्रामीण भागातही सर्रास विक्री करीत असल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत आहे. दारू व्यावसायिक आणि पोलिस यांच्यात अवैध दारू विक्री संबंधाने ताळमेळ असल्याने यातून पोलिस मोठ्या प्रमाणात मलई लाटत असल्याचे सांगण्यात येते. सदर अवैध वसुली कामासाठी काही खास पोलिसांची नेमणूक केल्याची जोरदार चर्चा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आहे.
गोंदिया शहरापुरते बोलायचे झाल्यास आजमितीला कुडवा परिसरात सुमारे १०-१२, सिविल लाइन परिसरात सुमारे ५, कुंभारे नगर परिसरात सुमारे ५ शास्त्री वॉर्ड परिसरात सुमारे ५ अवैध दारू विक्रीची दुकाने असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका दारू विक्री दुकानापासून पोलिसांना सुमारे १०-१५ हजाराचा हप्ता दिला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे ड्राय डे च्या दिवशी तर या अवैध दारू दुकानातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली जात असल्याचे सांगण्यात येते.
दारूविक्रीसंबंधाने न्यायालयाने कठोर आदेश दिले असल्याने आणि केंद्र व राज्य सरकारच्या प्रभावी अंमलबजावणी करीत असताना एकीकडे राज्याचे महसूल बुडत असल्याची राज्य सरकारची अप्रत्यक्ष ओरड आहे. अनेक परवानाधारक दारू विक्रेते आज चातकाप्रमाणे काही सवलत मिळते का,याच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे अवैध दारू विक्रीला पोलिसांचे पाठबळ असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध दारू प्रमाणेच गोंदिया शहरासह जिल्ह्यात सट्ट्याचा धंदासुद्धा जोरात सुरू असून जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले गोंदिया पोलिस मात्र अवैध कमाईवर जोर देत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळत आहे.