पत्रकार किशोर मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला

0
7

देसाईगंज,दि.९: नागपूर येथून प्रकाशित दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर काल(दि.८) रात्री ९ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी देसाईगंजनजीकच्या कुरुड फाट्यावर जीवघेणा हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असनू, हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.
किशोर मेश्राम हे काल रात्री देसाईगंजवरुन वृत्त संकलन करुन कुरुड या आपल्या स्वगावी मोटारसायकलने जात होते. दरम्यान देसाईगंजपासून दोन अज्ञात इसम मेश्राम यांचा पाठलाग करीत होते. कुरुड फाट्यावर या हल्लेखोरांनी मेश्राम यांची मोटारसायकल अडवून त्यांच्या दोन्ही पायावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामुळे मेश्राम यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ देसाईगंज येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस अधिकारी अतुल तवाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२६, २९४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. देसाईगंज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.