शेतकरी कर्जमाफीला घेऊन शिवसेनेचे जिल्हाबँकेसमोर ढोलवाजवून आंदोलन

0
17

गोंदिया,दि.10 : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज शिवसेनेने राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन केले.त्याअंतर्गतच गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीनेही गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.त्यानंतर बँकेचे प्रभारी व्यवस्थापक विलास वासनिक यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, तसेच जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेने हे आंदोलन केले. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.शिवसेनेनं याआधीही शेतकऱ्यांची बाजू लावून धरत त्यांना तातडीची 10 हजारांची मदत मिळवून दिली होती. आता सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी राज्यभर जिल्हा बँकासमोर ढोल वाजवून आंदोलन केले.या आंदोलनात जिल्हा शिवसेनाप्रमुख नगरसेवक राजकुमार कुथे,मुकेश शिवहरे, उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवार,तेजराम मोरघडे,हिमांशू कुथे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेनं जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवत आंदोलन केलं. संपूर्ण कर्जमाफी आणि सविस्तर माहिती मिळाली पाहिजे या मागणीसाठी आंदोलन केलं. विशेष म्हणजे नाशिक जिल्हा बँकेत अध्यक्ष उपाध्यक्ष शिवसेनेचेच आहेत.

ठाणे : ठाण्यातही शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल ताशा आंदोलन केलं. अजून एकाही शेतकाऱ्याला कर्जमाफी नाही दिली, यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 31 हजार पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. पण वारंवार बदलणाऱ्या शासनाच्या नियमामुळे कर्जमाफी झाली नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला. शेतकरी कर्जफेड करत नाही तेव्हा बँक त्याच्या घरसमोर ढोल ताशा वाजवते, म्हणून आज बँकेसमोर ढोल-ताशा आंदोलन करण्यात आलं, असं शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं.

पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेकडून आज जिल्हा मध्यवर्ती बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आलं . पुण्यातही पुणे स्टेशन परिसरात असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आणि त्यांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली.