कर्जाचा विनियोग स्वावलंबनासाठी करा- राजकुमार बडोले

0
13

गोंदिया,दि.१० : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील बेरोजगार तरुण-तरुणी, तसेच गरजू व्यक्ती हे स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बेरोजगार व गरजूंनी या महामंडळाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाचा विनियोग खऱ्या अर्थाने स्वावलंबनासाठी करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१० जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री श्री.बडोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जात पडताळणी कार्यायालचे संशोधन अधिकारी गौतम वाळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री.बडोले यावेळी म्हणाले, ५०० कोटीचे या महामंडळाचे भागभांडवल आहे. या महामंडळामुळे अनेकांनी उद्योग व्यवसायात यश संपादन केले आहे. कोणत्याही महामंडळाकडून घेतलेले कर्ज हे बुडविण्यासाठी असतात हा विचार सर्वप्रथम डोक्यातून काढावा. आज या महामंडळाचे भागभांडवल संपत असून नव्याने ७०० कोटी रुपये भागभांडवल मागण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळापैकी जास्त निधी या महामंडळाला देण्यात आला आहे. जिल्ह्यात या महामंडळाची कर्ज वसूली केवळ १२ टक्के आहे. ज्यांना महामंडळामार्फत कर्ज देण्यात आले आहे त्यांनी कर्जाची वेळीच परतफेड करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
भविष्यात अनुसूचित जातीतून उद्योजक घडविण्यासाठी या महामंडळाकडून कर्ज देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यापुढे कर्ज देतांना योग्य त्या व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल. ज्यांच्याकडे या महामंडळाच्या कर्जाची थकबाकी आहे त्यांच्याकडून कर्जाची वसूली करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना स्वावलंबी करण्यास हे महामंडळ निश्चित काम करेल असे ते म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश व प्रशिक्षणार्थी यांना विद्या वेतनाचे धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.आर.ठाकूर यांनी केले. संचालन श्री.मुळे यांनी, तर उपस्थितांचे आभार श्री.इंगळे यांनी मानले.