पेंशनसाठी आंदोलन तीव्र करणार

0
6

आलापल्ली दि. १२: जुनी पेंशन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, यासाठी राज्यभरात आंदोलन तीव्र केले जाईल, असा निर्धार महाराष्ट्र राज्य पेंशन हक्क संघटनेच्या अधिवेशनात करण्यात आला.
यावेळी वितेश खांडेकर, राज्य कमिटीचे शैलेश राऊत, नदीम पठाण, आशितोष चौधरी, वाघ उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान डीसीपीएस, एनपीएस योजना लागू करण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर घंटानांद, घेराव, मोर्चा आंदोलन काढण्यात येईल. जिल्हास्तरीय अधिवेशन घेण्यात येईल आदी ठराव पारित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील योगेश शेरेकर, नाशिक मधील राजेश कडू, सुशील गायकवाड यांची सर्वानुमते राज्य कमिटीवर निवड करण्यात आली. यावेळी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे गुरूदेव मुनघाटे, दशरथ पाटील, मनीष कावळे, नितीन कुमरे, सतीश खाटेकर, रमेश रामटेके, बापू नवघडे, अंकूश मैलारे आदी उपस्थित होते.
नितीन कुमरे यांच्यावर वन विभाग संघटनेचे तर रमेश रामटेके व सतीश खाटेकर यांच्याकडे दक्षिण गडचिरोली मधील इतर विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना खांडेकर यांनी वर्षभरात संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या लढ्यांची माहिती दिली. भविष्यातील धोके लक्षात घेऊन हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संघटनेची ताकद वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद करण्याचे आवाहन खांडेकर यांनी मार्गदर्शन करताना केले.