दहा पंचायत समित्यांना ११ कोटींचा निधी

0
12

चंद्रपूर दि.15 : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे कसोशीने प्रयत्न आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीपासून तर गावस्तरावरील यत्रंणा या कामास लागली आहे. गावस्तरावर शौचालय बांधकामाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नुकताच दहा पंचायत समित्यांना ११ कोटी ४ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली असून जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुके हागणदारीमुक्त म्हणुन घोषीत करण्यात आले असून सहा तालुके हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करुन नियमित वापर केल्यास गावातील घाणीचे साम्राज्य नाहीसे होण्यास मदत होणार आहे. यामुळे गावातील वातावरण आरोग्यदायी होऊन, लोकांचा जिवनमान उंचावण्यास मदत होईल.
जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले असून यासाठी गावातील प्रत्येकांनी जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या चळवळी मध्ये सहभागी झाल्यास लवकरच जिल्हा हागणदारी मुक्ती होईल. यासाठी जिल्हा परिषद दक्ष आहे. त्यानुसार आॅक्टोबर २०१७ अखेर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी नुकतीच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या प्रोत्साहन निधी वितरणास ११ कोटी ४ लक्ष रूपयांची मान्यता दिली. त्यानुसार पंचायत समित्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळणार आहे.