पुरुष नसबंदीत गोंदिया राज्यात दुसरा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे सन्मानीत

0
11

गोंदिया,दि.१५ : सन २०१६-१७ या वर्षात पुरुषांची नसबंदी करण्यात राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत गोंदिया जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून १० जुलै रोजी मुंबई येथे या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात आरोग्यमंत्री दिपक सावंत, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.विजय सतबीरसिंग, आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार व नागपूर आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांना गौरवचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.
जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात ९२०० इतके कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कालावधीत आरोग्य यंत्रणांनी जिल्हाभरातील ८४२६ व्यक्तींच्या शस्त्रक्रीया केल्या. यामध्ये १५३३ पुरुष व ६८९२ महिलांचा समावेश आहे. लहान कुटूंबाबाबत जनजागृती होत असल्याने कुटूंब नियोजनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामध्ये स्त्रियांची नसबंदी करण्याचे प्रमाण राज्यात अधिक आहे. स्त्री नसबंदीच्या तुलनेत पुरुषाची नसबंदी सोपी व कमी त्रासदायक आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने याबाबत जनजागृती केल्याने पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात सुमारे १५३४ पुरुषांनी नसबंदी केल्याची माहिती डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.