आदिवासी क्षेत्रासाठी स्वयम प्रकल्प; १० ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित

0
19

गोंदिया,दि.२८(सुरेश भदाडे) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुक्कुटपालन आणि आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यातील मुलांना आहारामध्ये अंड्यांचा पुरवठा करणे, या माध्यमातून त्यांचे कुपोषण थांबविणे तसेच या भागात स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी सन २०२० पर्यंत राज्यस्तरीय जनजाती क्षेत्र उपयोजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात स्वयम प्रकल्प राबविण्यात येणार आहे.यासाठी 10 आॅगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
देवरी, सालेकसा आणि अर्जुनी/मोरगाव या आदिवासी बहुल तालुक्यात आदिवासी प्रवर्गातील लाभाथ्र्यांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करणे आणि त्यांच्या कुटूंबांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे तसेच या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून अंगणवाड्यातील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करणे यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
वरील तीन तालुक्यातील अनुसूचित गावातून प्राधान्याने भूमिहीन शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक अशा ४१७ आदिवासी प्रवर्गातील लाभार्थींना ४ आठवडे वयाचे कोंबड्यांचे सुधारित देशी जातीचे लिंगभेद न केलेले ४५ पक्षी तीन टप्प्यात १०० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल. पक्षांचे लाभार्थीने परसदारी पालनपोषण करुन त्याद्वारे अंडी उत्पादन वाढविणे अपेक्षीत आहे. याकरीता निवड झालेल्या लाभार्थीचे प्रशिक्षण व क्षमतावृध्दी विभागामार्फत करण्यात येईल.
सुधारित देशी जातीचे कोंबड्यांचे एक दिवसाच्या पिलांचे ४ आठवड्यापर्यंत संगोपन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ३ मदर युनिटची स्थापना करण्यात येईल. या मदर युनिटमार्फत प्रत्येकी ४१७ लाभार्थींना सुधारित देशी जातीचे लिंगभेद न केलेले ४५ पक्षी तीन टप्प्यात १०० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल. मदर युनिट स्थापनेकरीता आदिवासी प्रवर्गातील कुक्कुटपालक अनुभवी लाभार्थी उपलब्ध असल्यास प्राधान्याने निवड करण्यात येईल.
या योजनेत सालेकसा तालुक्यातील हलबीटोला, धनेगाव, चांदसुरज, कुलरभट्टी, कोटरा, गोर्रे, सातगाव, पिपरिया, धनसुवा, दरेकसा, शेरपार, दंडारी, कोसमतर्रा, बंजारी, जमाकुडो, बाकलसर्रा, मुरकुडोह, टोयागोंदी, कोपालगड. देवरी तालुक्यातील इस्तारी, येळमागोंदी, कलकसा, शेरपार, गुजरबडगा, मिसपिरी, महाका, उचेपूर, वडेकसा, पाऊलझोला, चिल्हाटी, मेहताखेडा, कडीकसा, मुरमाडी, चिपोटा, ककोडी, गोठणपार, आंभोरा, शिरपूर, रेहडी, मोहाडी, वासनी, चिचगड, केशोरी, कोटजांभोरा, वांढरा, डोंगरगाव, मोहगाव. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील इळदा, परसटोला, कन्हाळगाव, अरतोंडी, खडकी, सायगाव, जांभळी, गार्डनपूर, गवर्रा, जुनेवानी, राजोली, भरनोली, तिरखूरी, कन्हाळगाव, धमदीटोला, गोठणगाव, रामपुरी, येलोडी, झाशीनगर, कुंभीटोला ही गावे समाविष्ट असून या गावातील आदिवासी प्रवर्गातील भूमिहीन शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
यासाठी देवरी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नमूद निर्धारित गावातून अनुसूचित क्षेत्रामधील पात्र आदिवासी प्रवर्गातील व्यक्तींनी संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती यांच्याकडे १० ऑगस्ट २०१७ पुर्वी विहित नमून्यात अर्ज सादर करावे. अधिक माहिती व अर्जाच्या नमून्यासाठी तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती सालेकसा, देवरी व अर्जुनी/मोरगाव यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त गोंदिया यांनी कळविले आहे.