नागपूरमध्ये भीषण अपघातात तीन जण ठार

0
15

नागपूर,दि.30 : भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे शनिवारी (दि. २९) रात्री ८.५० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कमलाबाई मधुकर पालेकर (७५), उमेश विनायक दहीकर (२५) आणि आॅटोचालक गजानन पांडुरंग चांदूरकर (४०) सर्व रा. माळेगाव (टाऊन) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये राजेंद्र मधुकर पालेकर (४०), अर्चना राजेंद्र पालेकर (३५), पारस राजेंद्र पालेकर (५) आणि सुनील चांदूरकर (२५) सर्व रा. माळेगाव (टाऊन) यांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सावनेरच्या शासकीय रुग्णालयातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले आहे.
एमएच-४०/१३९२ क्रमांकाच्या आॅटोने सर्वजण माळेगाव (टाऊन) येथे जात होते. सावनेरकडून माळेगावकडे आॅटोने वळण घेताच नागपूरकडून सावनेर दिशेने येणा-या एमपी-२८/सी-०३०१ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला जबर धडक दिली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर सर्व गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच नागरिकांनी सावनेरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथे गजानन चांदूरकरचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात होताच संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स पेटविली. पाहता – पाहता आगीने अख्खी ट्रॅव्हल्स भस्मसात झाली. यावेळी सावनेर पोलीस घटनास्थळी असून काहीच करू शकले नाही. जमावासमोर पोलिसांचे काहीएक चालले नाही. ट्रॅव्हल्स विझविण्यासाठी सावनेर नगर परिषदेचे अग्निशमन दल आले असता नागरिकांनी त्यांच्या दिशेने गोटमार करून अग्निशमन दलाचा विरोध करीत त्यांना परत पाठविले. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळाहून पसार झाला.