झेंडेपार लोहप्रकल्पात स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

0
12

गोंदिया,(बेरार टाईम्स) दि.13: गडचिरोली जिल्हा तसा मागास जिल्हा.या जिल्ह्यातील वनसपंदा व गौणखनिजावरील प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात हातभार लागून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो.त्यासाठी लोहप्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे.त्यादृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे लोहप्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.त्यासाठी तीन ते चार कंपन्यांनी प्रशासनाकडे आपली ईच्छा दाखविली.त्यानुसार प्रशासनानेही लोहप्रकल्प उभारणीसाठी स्थानिकांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.परंतु भूमिका जाणून घेतांना कोरची ते गडचिरोली हे अंतर जिल्हाधिकारी यांनी लक्षातच ठेवले नाही.कोरची तालुका आदीच आदिवासी व नक्षलग्रस्त असताना त्या तालुक्यात प्रकल्पाबाबतची जनसुनावणी त्या ठिकाणी केली असती तर मोठ्या संख्येने स्थानिकांना त्या जनसुनावणीत सहभागी होता आले असते.परंतु नेमके प्रशासनाला नेमके हेच नको असल्याने जनसुनावणी जिल्हामुख्यालयी ठेवली.त्यातही कमी संख्येने गेलेल्या परंतु प्रकल्पाचा विरोध करणार्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही,त्यांना पोलिसी धाकात सभागृहाबाहेर काढण्यात आले.तरीही नागिरकांनी केलेल्या विरोधामुळे नाईलाजास्तव का होईना प्रशासनाला जनसुनावणी रद्द करावी लागली.सदर लोहखनिज 45 हेक्टर परिसरात असून जवळपास 10 किलोमीटरच्या परिसरात जंगलासह,वनसंपती,वनौषधी,नद्या आदी भाग आहे.
अनूज माईन्स अ‍ॅन्ड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचाच उल्लेख होता. प्रत्यक्षात जनसुनावणी करताना चार कंपन्याच्या नावे काही व्यक्ती सहभागी झाले होते.येथील लोहखनिज काढून तो चामाेर्थी येथील कंपनीला भविष्यात दिला जाऊ शकतो असेही बोलले जात आहे. इतर कंपन्यांबाबत प्रशासनाने स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवले. याबाबत काही जणांनी विरोध केले असता, त्यांना बाहेर काढले जात होते.प्रशासनाने व कंपनीने स्थानिक नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप लोह प्रकल्प विरोधी कृती समितीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.जनसुनावणी स्थगित करुन पंधरवाडा लोटत चालला मात्र नवी तारीख अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही.त्यातच या लोहप्रकल्पाबद्दल अधिक ओरड होऊ नये प्रसिध्दी माध्यमातून समोर येऊ नये आदी गोंष्टीची काळजी ज्या कंपनीला हा लोहप्रकल्प घ्यायचा आहे,त्या कंपनीच्या व्यवस्थापन प्रशासनाने चांगलीच काळजी प्रसिध्दी माध्यमांची घेतल्याची कोरची परिसरात फेरफटका मारल्यावर लक्षात आले.विशेष म्हणजे जे आदिवासी विरोध करीत आहेत,ज्यांची शेतीलाही या प्रकल्पाची झळ पोचणार आहे.त्यांना अद्यापही काहीही मिळाले नसले तरी लोकशाहीच्या चौथ्या स्तभांला मात्र विदेश यात्रेचे पॅकेज संबधित लोहप्रकल्पासाठी इच्छुक असलेल्या कंपनीच्यावतीने देण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या गुप्तशाखेकडेही असल्याची चर्चा आहे.
कोरची येथील झेंडेपार येथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. या ठिकाणी लोहप्रकल्प निर्माण करण्यासाठी स्थानिकांची परवानगी आवश्यक आहे. यासाठी जनसुनावणीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याच आले होते. मात्र झेंडेपार परिसरातील नागरिकांना गडचिरोली येथे जाणे शक्य नसल्याने कोरची या तालुकास्थळी जनसुनावणी घेण्याबाबतची मागणी केली जात होती. मात्र प्रशासनाने आपला हट्ट कायम ठेवत गडचिरोली येथेच ३ आॅगस्ट रोजी जनसुनावणी ठेवली. या जनसुनावणीला कोरची तालुक्यातील काही नागरिक उपस्थित झाले. मात्र कोरची येथे जनसुनावणी न ठेवल्याबाबतचा रोष नागरिकांमध्ये दिसून येत होता.
शासनाच्या नियमानुसार परिसरातील प्रत्येक नागरिकाचे मत जाणून घेणे आवश्यक असतानाही गडचिरोली येथे का जनसुनावणी ठेवली, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही नागरिक लोह प्रकल्पाच्या बाजुने तर काही नागरिक विरोधात बोलत होते. त्यामुळे जनसुनावणीदरम्यान प्रचंड गदारोळ निर्माण झाला. परिणामी अधिकाºयांना जनसुनावणी रद्द करावी लागली. काही नागरिकांनी पुढील जनसुनावणी कोरची येथेच घेण्याबाबतचे लेखी आश्वासन अधिकाºयांना मागितले.मात्र अधिकाºयांनी न दिल्याने नागरिकांत अजूनही असतोंष दिसून येत आहे.