जुन्या बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप;अडत्यांना ‘प्रवेशबंदी’

0
9

गोंदिया,दि.13 : येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप लावून अडत्यांना बाजार समितीत शनिवारी (दि.१२) प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या आदेशावरून कुलूप लावण्यात आले. अडत्यांनी आपला व्यापार नवीन मार्केट यार्डमध्ये करावा हा या मागचा उद्देश आहे. मात्र पणन महामंडळाने स्थानांतरणावर स्थगिती दिली असताना संचालक मंडळाने केलेली कारवाई पणन महामंडळाच्या आदेशाची अवहेलना करणारी असल्याने संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी ग्रेन मार्केट अडतिया व्यापारी असोसिएशनने केली आहे.
येथील बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डमध्ये स्थानांतरणाचा विवाद सन २०१३ पासून सुरू आहे.बाजार समिती संचालक मंडळाने जुन्या बाजार समितीतील व्यापार नवीन मार्केट यार्डमध्ये स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेतला.परंतु त्याला व्यापारी व अडते विरोध करीत आहेत,त्यामागील कारण सुविधांचे सांगितले जात असले तरी त्याठिकाणि मोजावे लागणारे अधिक भाडे व इतर गोष्टी असल्याचे बोलले जात आहे.या विषयाला घेऊन अडत्यांनी पोलिसांत तक्रार दिली व त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्तीने सायंकाळी बाजार समितीचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
अडते आपला व्यापार जुन्या यार्डातच चालवित होते. अशातच मात्र संचालक मंडळाने शुक्रवारी (दि.११) सायंकाळी जुन्या बाजार समितीच्या मुख्य द्वारावर कुलूप लावण्याचे आदेश दिले.
यामुळे शनिवारीही (दि.१२) बाजार समितीच्या मुख्यद्वारावर कुलूप लावलेले होते व अडत्यांना बाजार समितीत प्रवेशबंदी करण्यात आली. संचालक मंडळाच्या आदेशावरून कुलूप लावण्यात आल्याचे बाजार समितीच्या सेक्युरिटीचे म्हणणे आहे..
महामंडळाने या विषयाला घेऊन १८ तारखेला सुनावणी ठेवली असल्याचे अडते असोसिशएनचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांचे म्हणने असून शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ५.४५ वाजता बाजार समितीच्या आवक-जावक विभागात पत्र दिले. संचालक मंडळाच्या आदेशावरून बाजार समितीत अडत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याने ही पणन महामंडळाच्या आदेशाची अवहेलना असल्याचे अग्रवालांचे म्हणने आहे.
बाजार समितीतील व्यापार नवीन यार्डात स्थानांतरीत करण्यासाठी बाजार समितीने अडत्यांना १ एप्रिल रोजी पत्र दिले होते. मात्र अडत्यांनी नवीन यार्डात सर्व सुविधा नसल्याने अडते त्याला विरोध करीत होते. यावर बाजार समितीने ११ मे रोजी व्यापार नवीन यार्डात स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेतला. यावर अडत्यांनी २ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ७ जून रोजी झालेल्या सुनावनीत बाजार समिती संचालक मंडळ व अडत्यांनी आपसी सामंजस्याने हा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते. यावर अडत्यांनी १८ जुलै रोजी न्यायालयाकडून पणन महामंडळाकडे जाण्याची परवानगी घेत २७ जुलै रोजी पणन मंडळाकडे अपील केली होती. यावर ८ आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत पणन मंडळाने स्थानांतरणाला स्थगिती देत १८ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे. याबाबत अडत्यांनी शुक्रवारी (दि.११) बाजार समितीला पत्र दिले. तरिही बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावून अडत्यांना प्रवेशबंदी केल्याचा आरोप अडत्यांनी केला आहे.मात्र याप्रकरणात सत्ताधारी एका राजकीय पक्षाचे पदाधिकारीच जाणीवपुर्वक हा प्रकार घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा असून त्या पक्षाच्या एका नेत्याने बाजार समितीच्या उपसभापतीला शिविगाळही केल्याचे प्रकरण समोर आले होते.