ज्येष्ठ नागरिकांनी न्यायासाठी कायदयाचा आधार घ्यावा- न्या.श्रीमती मालोदे

0
23

गोंदिया,दि.४ : आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना न्याय पाहिजे आहे त्यांनी कायदयाचा आधार घ्यावा. असे प्रतिपादन न्या.श्रीमती मालोदे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संघ गोंदिया यांच्या संयुक्तवतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन नुकतेच गोंदिया येथे करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून न्या.श्रीमती मालोदे बोलत होत्या. तज्ञ मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड.बिणा बाजपेई, नेतराम पारधी, श्रीमती आशा ठाकुर, अ‍ॅड.आगाशे यांनी मार्गदर्शन केले.
न्या.श्रीमती मालोदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी आपण एकटे असल्याची भावना मनात आणू नये. तुमच्या पाठीशी इतर ज्येष्ठ नागरिक व संघटना आहेत. प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण हे येणारच आहे. व्यक्ती हा विचाराने कमजोर होत नाही तर शरिराने कमजोर होतो. घरातील कुटूंबातील व्यक्तींनी त्यांचे घरातील ज्येष्ठ नागरिकांचा आदर ठेवावा व जीवनात त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे त्या म्हणाल्या.
बाजपेई यांनी नागरिकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्य याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात किंवा बाहेर ठिकाणी नोकरी करतात व त्यांचे ज्येष्ठ नागरिक असलेले आई-वडील एकटे राहतात त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी ज्येष्ठ नागरिक वृध्दाश्रमात जाणून आपले एकटेपण दूर करतात असे त्यांनी सांगितले.
श्री.पारधी यांनी ज्येष्ठ नागरिकाबाबत शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. श्रीमती ठाकुर यांनी ज्येष्ठ नागरिक हे एकटे नसून त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यांनी एकटेपण बाळगू नये, तसेच त्यांच्या हक्काकरीता त्यांनी जागृत राहावे असे त्यांनी सांगितले. ?ड.आगाशे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, संयुक्त कुटूंबामुळे विकास होतो, परंतू आज संयुक्त कुटूंब पध्दती कमी झालेली दिसून येते. वयोवृध्द व्यक्तीकरीता प्रत्येकाने सहकार्याची भावना ठेवावी तसेच त्यांना मदत करावी असे सांगितले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक एस.जी.कान्हे, जी.सी.ठवकर, श्रीमती डी.ए.थोरात, जी.एन.जैतवार व हेरॉल्ड बॅस्टीन यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार अ‍ॅड.एम.पी.चतुर्वेदी यांनी मानले.